नरेंद्र मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी उदयनराजे भोसले यांना विजयी करा ; वाठार येथील बैठकीत खा. सुनील मेंढे यांचे आवाहन
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
देशाचे सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सातारा लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना निवडून द्या, असे आवाहन भंडारा-गोंदिया लोकसभेचे खासदार सुनील मेंढे यांनी केले
भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ वाठार येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले,
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश पाटील-वाठारकर, माजी जि. प. सदस्य गणपतराव हुलवान, अधिकराव पाटील, दिनकर मोरे, प्रकाश पाटील, प्रमोद पाटील, पांडुरंग पाटील, दत्तात्रय पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
खा. सुनील मेंढे म्हणाले , या देशात काँग्रेसने आपल्या कार्यकाळात प्रचंड भ्रष्टाचार केला. गरिबी हटावचा नारा दिला आणि लोकांना गरीबच ठेवले. गेल्या १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही.
दर ६ महिन्याला राहुल गांधी परदेशात जातात. त्यांना शेतीचे ज्ञान नाही. मोदीजी एक दिवससुद्धा सुट्टी घेत नाहीत. संपूर्ण आयुष्य सर्वसामान्य लोकांसाठी काम करत आहेत. प्रत्येक क्षण देशातील जनतेसाठी घालवत आहात. सर्व योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. सर्वसामान्य लोकांना योजनांचा लाभ मिळवून दिला आहे.
समाजातील प्रत्येक घटकांचा विचार करून, योजना तयार करून त्या राबविल्या जात आहेत. गोरगरीब जनतेला केंद्रबिंदू मानून योजना राबविल्या आहेत. विकासाची मोठ्याप्रमाणात कामे केली जात आहेत. सबका साथ सबका विकास या भूमिकेने मोदींजींनी काम केले आहे. येणाऱ्या काळात अजून लोकहिताच्या योजना मोदीजी आणणार आहेत.
डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्या कराड दक्षिणमधील प्रमुख जिल्हा मार्गावर मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी चांगली भूमिका घेत, देशहिताचे निर्णय घेणाऱ्या भारतीय जनता पार्टीसोबत राहण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून जनधन योजना, संरक्षण क्षेत्रात वन रँक वन पेन्शन योजना आणली गेली. ३७० कलम हटवले. राम मंदिर उभारले. मोदींचे सरकार हे दिलेला शब्द पाळणारे सरकार आहे. सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचे काम मोदी सरकार करते.
ऊसदरावरील इन्कमटॅक्स कमी करण्याचे काम सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून गृहमंत्री अमित शहा यांनी केले. खासदार उदयनराजे भोसले यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायचे आहे. ७ तारखेला मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी उदयनराजे यांना कमळाच्या चिन्हा समोरील बटन दाबून विक्रमी मताधिक्य द्या.
राजेश पाटील-वाठारकर म्हणाले, निवडणुकीत जास्तीत जास्त मते उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांना देऊन मोदींच्या विचाराला साथ द्यायची आहे. मोदींनी नोटाबंदी केली अशी टीका केली जाते, पण जास्तीत जास्त ऑनलाईन व्यवहार सुरू झाले आणि बँकिंग क्षेत्रात चांगले पडसाद उमटले आहेत. मोदींजींनी अनेक लोकहिताचे निर्णय घेतले आहेत.