बेलवडे बुद्रुक सोसायटीकडून सभासदांची दिवाळी गोड!
पाच टक्के लाभांश अन् सोबत दिवाळी भेट

कराड | प्रतिनिधी
यंदा कराड तालुक्याच्या दक्षिण विभागात मोठी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी सणासुदीला हुकमी चार पैसे मिळवून देणाऱ्या सोयाबीन, भुईमुग यासारख्या पिकांचं यंदा उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलं आहे. त्यातच दिवाळी सण तोंडावर आला आहे, त्यामुळे गावागावातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यासमोर आर्थिक चणचण निर्माण झाली आहे. मात्र या परिस्थितीत दिलासा देणारा निर्णय कराड तालुक्यातील बेलवडे बुद्रुक गावातील एका छोट्या सहकारी सोसायटीने घेतला आहे. या सोसायटीने आपल्या सरसकट सर्वच्या सर्व सभासदांना पाच टक्के लाभांश आणि सोबतीला दिवाळी भेट दिली आहे.
ही सोसायटी आहे बेलवडे बु.वि.का.स.सेवा सोसायटी. संस्थेचे एकूण 320 सभासद असून वार्षिक उलाढाल सरासरी सव्वा कोटीच्या घरात आहे. भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांची यंदाच्या दिवाळीपूर्वी निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन या सहकारी सोसायटीने आपल्या सभासदांना सरसकट पाच टक्के लाभांश आणि दिवाळी भेट जाहीर केली आहे. संस्थेने जाहीर केलेला पाच टक्के लाभांश सातारा जि.म.सह बँक शाखा बेलवडे बु.मधील सभासदांच्या सेव्हिंग खातेवरती जमा करण्यात आला आहे. तसेच सभासदांना दीपावली गिफ्ट उद्या, सोमवार पासून दि. ६ पासून दिले जाणार असल्याचे चेअरमन जयवंत मोहिते व व्हा. चेअरमन गजानन मोहिते यांनी सांगितले.
अॅड. जयवंतराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कामकाज उत्तमरीत्या सुरू आहे. चेअरमन जयवंत मोहिते, व्हा. चेअरमन गजानन मोहिते, संचालक मकरंद मोहिते, प्रकाश मोहिते, वसंत मोहिते, जयवंत मोहिते फौजी, जयकर मोहिते, नामदेव मोहिते, माणिक मोहिते, दादासो मोहिते, झाकीर मुल्ला, जयसिंग वडार, खलीप वाघमारे, चैत्राली मोहिते, आशा मोहिते हे संस्थेचे काम पाहत आहेत. सचिव सुरज घारे आणि क्लार्क निलेश मोहिते हे संस्थेचे सेवक आहेत.
दिवाळी भेटीत सात वस्तूंचा समावेश…
संस्थेने अ, ब, वर्ग सभासद , असा भेदभाव न करता सरसकट 320 सभासदांना पाच टक्के लाभांश जाहीर केला आहे. शिवाय संस्थेने दिलेल्या दिवाळी गिफ्ट मध्ये सुगंधी तेल, पणती पुडा, उटणे, मोती साबण, चकली मसाला पुडा, चिवडा मसाला पुडा, आणि दोन किलो साखर या सात वस्तूंचा समावेश आहे.
दरवर्षी शंभरटक्के वसुली, 50 हजाराचे मिळते बक्षीस…
या सोसायटीने गेल्या आठ वर्षापासून वसुलीचे प्रमाण शंभर टक्के ठेवले आहे. त्यामुळे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं 50 हजार रूपयांचे बक्षीसही संस्थेला मिळत असतं. या माध्यमातून सभासदांच्याप्रती शंभर टक्के उत्तरदायित्व संस्था निभावत असून या संस्थेने पंचक्रोशीतील अन्य सहकारी सोसायट्यांच्यासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.