महिला दिन का साजरा केला जातो ; प्रा. संगीता देशमुख यांनी सांगितलं हे कारण
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
विद्यानगर सैदापूर (ता. कराड) येथे समाजभूषण बाबुराव गोखले ग्रंथालय व इनरव्हील क्लब मलकापूर सनराईज यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
यावेळी कृष्णा महाविद्यालय रेठरे बुद्रुक येथील प्रा. संगिता देशमुख म्हणाल्या, “जगभरात आठ मार्च हा दिवस स्त्रीत्वाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. महिलांच्या समान हक्कासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी या दिवशी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार केला जातो. महिलांना नोकरी व मतदानाचा हक्क मिळावा म्हणून न्यूयॉर्कमध्ये रस्त्यावर उतरून महिलांनी मोर्चा काढला तो हा दिवस 8 मार्च दिवस होता. यामुळे पुढे हे दोन्ही हक्क महिलांना मिळाले. स्त्रियांचे जीवन अतिशय संघर्षपूर्ण असते आणि जिथे संघर्ष असतो तेथे यश असते. पूर्वीपासून अन्याय सहन करीत आलेली स्त्री आता कुठे हळूहळू स्वतःच्या पायावर उभी राहू लागली आहे. नकारात्मक विचार बाजूला ठेवून ती सकारात्मक विचारांच्या वाटेने चालू लागली आहे. दररोजच्या धावपळीत ती जगणं विसरून गेली आहे. यासाठी छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. वेळ काढून वाचन करा. वाचन हे आलेल्या नैराश्यावर सर्वोत्तम औषध आहे. स्त्रिया घराला सुसंस्कृत व संस्कारमय बनविण्याचा प्रयत्न करतात. स्त्रियांकडे विविध क्षेत्रात काम करण्याची प्रचंड ऊर्जा व शक्ती आहे. राष्ट्राच्या उन्नतीसाठी स्त्री शक्ती ही राष्ट्राची शक्ती व्हावी”
यावेळी इनरव्हील क्लब मलकापूर सनराइजच्या अध्यक्षा पूजा वखारिया व ग्रंथालयाच्या कार्यवाह प्रा. सूर्यमाला जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी इनरव्हील क्लबच्यावतीने प्रा. सौ. पल्लवी पाटील यांनी ग्रंथालयास 2500 रुपयांची ग्रंथ भेट दिली. याप्रसंगी ग्रंथालय व इनरव्हील क्लब यांच्यावतीने विविध क्षेत्रातील पन्नास महिलांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमास ग्रंथालयाचे संचालक अभिजीत इंगळे, प्रा. टी.एच. ऐवळे, प्रा. अलकेश ओहळ, सौ.अनुराधा जाधव,सौ.शितल खेतमर, ग्रंथपाल रुकसाना नदाफ, सीमा कांबळे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दादाराम साळुंखे यांनी केले. आभार सौ. कांचन धर्मे यांनी मानले.