संदेशखली घटनेच्या निषेधार्थ भाजपा महिला मोर्चाची कराडमध्ये तीव्र निदर्शने

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
पश्चिम बंगालमधील संदेशखली येथे झालेल्या महिला अत्याचाराविरोधात भाजपा महिला मोर्चाच्यावतीने कराड येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष सौ. चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निदर्शनात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
पश्चिम बंगाल येथील संदेशखली येथे झालेल्या महिला अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपच्यावतीने देशभर निदर्शने करण्यात येत आहेत. याचा भाग म्हणून भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य चित्रा वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील महात्मा गांधी पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली.
या आंदोलनात ममता बॅनर्जी यांची तानाशाही नही चलेगी, असे म्हणत सौ. वाघ यांनी तृणमूल काॅंग्रेसवर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने महिला अत्याचारातील आरोपीला पाठीशी घातले होते. गेल्या ५५ दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेतील आरोपीला केवळ भाजपच्या रेट्यामुळे अटक झाली असून, तो बांग्लादेशातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबद्दल ममता बॅनर्जी गप्प का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
याप्रसंगी चित्रलेखा माने – कदम, भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य स्वाती पिसाळ, कराडच्या माजी नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, डॉ. सारिका गावडे, कविता कचरे, नम्रता कुलकर्णी, मंजिरी कुलकर्णी, सुनीता शहा, वर्षा सोनावले, सुवर्णाताई पाटील, नीता जाधव, श्यामबाला घोडके, सुरेखा माने, सुवर्णा काकोडकर, सीमा घार्गे, वैष्णवी कदम, नंदाताई यादव, कविता माने, सविता मोहिते यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.