कराड दक्षिण मतदारसंघातील सेक्टर ऑफिसर्स व सहाय्यक सेक्टर ऑफिसर्स यांना पीपीटी द्वारे व प्रत्यक्ष मशीन हाताळणीचे प्रशिक्षण
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
260 कराड दक्षिण मधील विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्र तयार करण्यासाठी नियुक्त सेक्टर ऑफिसर्स व सहाय्यक सेक्टर ऑफिसर्स यांचे प्रशिक्षण स्ट्रॉंगरूम शेजारील प्रशस्त हॉलमध्ये संपन्न झाले. प्रशिक्षणार्थींना निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी पीपीटी द्वारे व प्रत्यक्ष मशीन हाताळणीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. यावेळी आचारसंहिता सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप पाटील, निवडणूक नायब तहसीलदार हेमंत बेसके, प्र.नायब तहसीलदार युवराज पाटील उपस्थित होते.
सेक्टर अधिकाऱ्यांना याबाबत सूचना करताना निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे म्हणाले, मतदान यंत्रे तयार करतेवेळी अत्यंत काळजीपूर्वक व त्रुटी राहणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी. तुम्हाला जे मशीन्स तयार करायची आहेत त्याची यादी सोबत दिली आहे. बॅलेट युनिटच्या कक्षातच त्याचा नंबर लिहावा. हे सर्व काम सेक्टर ऑफिसर्सनी डोळसपणे व काळजीपूर्वक बघूनच करावयाचे आहे. यावेळी अधिक माहिती देताना ते म्हणाले, पिंक पेपरसील सिरीयल नंबर नुसार ज्या-त्या मशीनलाच काळजीपूर्वक लावण्यात यावे. त्यानंतर बॅलेट युनिटला व्हीव्हीपॅट व व्हीव्हीपॅटला कंट्रोल युनिट असा मशीन्स जोडणीचा क्रम सांगून पहिला, दुसरा व तिसरा राऊंड किती मिनिटाचा असेल याबाबत सूचित करून त्या त्या वेळेतच कामकाज पूर्ण करावे असे त्यांनी सांगितले. तिन्ही मशीन्समध्ये व्हीव्हीपॅट मशीनला सिम्बॉल लोडिंग, रोलपेपर आणि बॅटरी बदलणे हे काम पूर्ण करूनच मशीन दिले जाईल. त्यानंतर बॅलेट युनिटचा थंबव्हील कुठे पाहिजे, नोटासह किती बटन ओपन पाहिजेत, व्हीव्हीपॅटचा नॉब आडवा की उभा आहे हे यासह अन्य महत्वपूर्ण बाबींबाबतची माहिती दिली. बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट ओके झाल्यानंतर मॉकपोल मध्ये एक एक मते दिली का ? मशीन मधील स्लिप्स मोजल्या आहेत का ? सर्व मशीन चे लेड बल्ब लागतायत का ? याची खात्री करावी. मॉकपोल नंतर सीआरसी केले आहे का ? त्यानंतर कंट्रोल युनिटचा नॉब आडवा करून व्हीव्हीपॅटला सील करून घ्यावे व स्टिकर लावावे असे सांगून मशीन मध्ये एरर राहणार नाही याची काळजी सर्व सेक्टर ऑफिसर्सनी घ्यावी असे सांगून सर्वांना या कामाच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.