कराड-पाटण तालुक्यात जंगलाबाहेर बिबट्यांची संख्या झाली उदंड!
बिबट्या-मानव संघर्ष टाळण्यासाठी निश्चित धोरण आखण्याची गरज
चांगभलं ऑनलाइन | रोहन भाटे
आज कृष्णा,सह्याद्री, अजिंक्यतारा,मरळी, शेडगेवाडी, पाली, ह्या साखर कारखान्यामुळे उसाची झालेली प्रचंड लागवड , उसाने बिबट्याच्या सर्व गरजा भागवल्या आहेत.
आज जवळपास दोन दशक बिबट्याचे यशस्वी प्रजनन उसाच्या रानात होत आहे बिबट्याच्या जवळपास तीन ते चार पिढ्या जन्माला या उसात आल्या आहेत त्यांच्या मेंदूत जनुकीय बदल झाले आहेत व बिबट्या नर मादी ने आपल्या जन्माला येणाऱ्या पिलांना हे उसाचे रान म्हणजेच आपले घर म्हणून त्या पिलांना गर्भात बिंबवले आहे. हे एक जनुकीय बदल आहे.
जंगलात सोडलेले बिबटे पुन्हा उसाच्या शेताकडे…
उसाच्या शेतातील बिबट्यांना जेरबंद करून वनविभागाने अभयारण्यात जंगलात पुन्हा सोडलेही पण त्या बिबट्यांना जंगल हे आपले घर आहे हे माहितच नाही ते उसाचेच रान म्हणजेच आपले सुरक्षित घर मानतात व पुन्हा उसाच्या शेतातच येतात. बिबट्या हा प्राणी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला जुळवून घेतो हे या प्राण्याचे वैशिष्ट्य आहे. बिबट्यांचे वास्तव्य जंगलाबरोबरच जंगल परिसरातील गावांच्या आसपास तसेच बागायती ऊस शेती क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणावर दिसून येते. बिबट्या खरंतर माणसांच्या वस्तीच्या आजूबाजूला वावर बिन्धास्त करतात. बिबट्या हा चोरटा शिकारी आहे जंगलात हा हरीण बेकर ,माकड, वानर, छोटी रानडुक्कर, साळिंदर, ससा अशी शिकार करतो. तर जंगलाबाहेर शेळी, मेंढी, छोटे रेडकू, कोंबड्या, मोर, इतर शिकार करतात. मनुष्य वस्ती जवळ भटकी कुत्री, डुक्कर ही तर सर्वात आवडती शिकार. अगदी प्रतिकूल परिस्थितीत बेडूक, उंदीर, घुशी, खेकडा, खाऊन आपली भूक भागवतो. बिबट्या हा झाडावर सहज चढून जातो.
जंगलाबाहेर कराड पाटण तालुक्यातील बिबट्यांची वाढती संख्या ही खरोखर चिंतेची बाब….
बिबट्यांची संख्या जंगलाबाहेर कराड पाटण तालुक्यात जास्त आहे ही खरोखर चिंतेची बाब आहे मुद्दामून सुरक्षा कारणास्तव आकडा सांगत नाही. शासन दरबारी वन्यजीव विभाग कडून चार वेळा नित्यनेमाने वन्यजीव गणना व्याघ्र प्रकल्पात राबवले जाते. त्याचबरोबर व्याघ्र प्रकल्पात कॅमेरा ट्रॅप मध्येही यांची संख्या कळते पण ह्या उलट स्थिती प्रादेशिक वनविभागातील, प्रादेशिक विभागाच्या ताब्यातील जंगलात व मनुष्य वस्तीत आहे तेथे असे नियोजनबद्ध वार्षिक कार्यक्रम हाती घेतला जात नाही. त्यामुळे आज अभयारण्य राष्ट्रीय उद्यान व्याघ्र प्रकल्पातील प्राण्यांची संख्या ही गणली जाते त्यांची संख्याची साधारण माहिती असते एक ठोकताळा या वन्यजीव विभागाकडे आहे, पण हा अभाव प्रादेशिक वन विभागाकडे आहे. शासनाने खरेच जागे झाले पाहिजे भविष्यात जंगलाबाहेरील बिबट्यांची संख्या हा मोठा प्रश्न मानव बिबट्या संघर्ष निर्माण करू शकतो. जुन्नर सारखी परिस्थिती कराड पाटण तालुक्यात निर्माण होऊ शकते आणि या गंभीर परिस्थितीला सामोरे जाण्याची आपली तयारी नाही.
कराड पाटण तालुक्यातील 39 नवीन गावांजवळ बिबट्यांचा वावर…
महाराष्ट्रात जुन्नर खालोखाल सर्वात जास्त बिबट्यांची संख्या सातारा जिल्ह्यात कराड व पाटण तालुक्यात आहे. जवळजवळ 39 नवीन गावे आहेत जेथे बिबट्या व काही ठिकाणी मादी बिबट्या पिलांस आपल्या अस्तित्व वारंवार दाखवत आहे. ऊस शेती हे त्याच्या लपण्यासाठी निवाऱ्यासाठी खूप पोषक आहे. मादी प्रजनन कालावधी वर्षभर असून साधारण तीन पिल्लांना जन्म देते, क्वचित प्रसंगी चार ते पाच. 2001 2002 मध्ये पुणे जुन्नर वनविभागात जवळपास 11 लोकांचा बळी गेला आणि २५ हून अधिक लोक बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये जखमी झाले होते. तेव्हा त्यांची चर्चा स्थानिक व राजकीय पातळीवर खूप झाली बिबट्या व मानव संघर्ष हा विषय प्रसार माध्यमाने खूप उचलून धरला. दबावला बळी पडत जुन्नर विभागाने 103 बिबट्यांना पकडून एक रेकॉर्ड केले. त्याची लिंकाबुक रेकॉर्डमध्ये नोंद झाली तर एका अधिकाऱ्याला शौर्य पदक देऊन गौरविण्यात आले. ह्यापैकी काही बिबट्यांना माणिकडोह बिबट निवारण केंद्र व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बंदिस्त करण्यात आले, तर जवळपास 16 बिबट हे चांदोली राष्ट्रीय अभयारण्यात सोडण्यात आली. त्यावेळेस जुन्नर मधील प्रश्न सुटला असे काही तज्ञांनी जाहीर केले. पण चांदोली मधील सोडलेले काही बिबट हे पुन्हा जुन्नर पर्यंत गेले हे एका अभ्यासात सिद्ध झाले. मांजर कुळात ते जन्मजात आपल्या स्वग्रही परतण्याची एक ओढ असते , त्या पकडलेले बिबट्यांची शेपटीमध्ये एक विशिष्ट प्रकारची मायक्रोचीप त्यांना सोडण्यापूर्वी लावलेले होते. ते पुन्हा काही वर्षांनी जुन्नर भागात धुमाकूळ घालताना पिंजऱ्यात सापडले त्यावेळेस शेपटीमधील मायक्रोचीप मुळे ते सिद्ध झाले. तर काही बिबट सह्याद्रीमध्ये स्थिरावले तर काही आजूबाजूच्या बफरमध्ये स्थिरावले. परंतु आता कराड तालुक्यात बिबट्यांची संख्या वाढलेली आहे व झपाट्याने वाढत आहे.
साखर कारखान्यांचा ऊस पट्टा झालाय निवारा केंद्रं…
विपुल अन्नपाणी दिवस रात्रीसाठी उत्तम निवारा प्रजनन पिल्लांचे संगोपन पिल्लांची सुरक्षितता यासाठी सुरक्षित जागा ह्या प्राण्यांच्या गरजा आहेत व त्या कराड पाटण तालुक्यातील बिबट्यास मिळाल्या. कृष्णा, सह्याद्री,अजिंक्यतारा, मरळी रयत, पाली,या कराड पाटण परिसरात असलेल्या साखर कारखान्यामुळे उसाची प्रचंड मोठ्या प्रमाणात लागवडीखाली असलेले ऊस क्षेत्र आहे. हे या बिबट्यांचे मोठे निवारा केंद्र आहे. कृष्णा कोयना नदीमुळे मुबलक प्रमाणात पाणी आहे, तसेच विपुल प्रमाणात खाद्य उपलब्ध आहे .जेव्हा कोणत्याही वन्यप्राण्यासाठी परिस्थिती अनुकूल असते तेव्हा त्यांची संख्या झपाट्याने वाढते. बिबट मादीचा प्रजनन कालावधी वर्षभर असून साधारण तीन पिल्लांना जन्म घालते. पण आता तर मादी कधीकधी चार तर अपवाद परिस्थितीत पाच पिल्लांना जन्म घालते.
संख्या समजण्यासाठी ग्रामपंचायतींच्या जैवविविधता नोंदवही उपयुक्त ठरतील…
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तर तो विपुल प्रमाणात आढळतोच आज आजच्या तारखेला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर बिबट्यांची नोंद आहेच प्रकल्पातील प्रत्येक कॅमराठी मध्ये दोन ते तीन वेगवेगळे बिबट्या दिसतात. परंतु जंगल व राखीव वन क्षेत्र बाहेर महाराष्ट्रात जुन्नर खालोखाल सर्वात जास्त बिबट्यांची संख्या सातारा जिल्ह्यात कराड व पाटण तालुक्यातील उसाच्या पट्ट्यात आहे. जवळपास 39 नवीन गावे आहेत जेथे बिबट्याने आपल्या अस्तित्व वारंवार दाखवलेले आहे. ऊस शेती हे त्याच्या लपण्यासाठी निवाऱ्यासाठी खूप पोषक आहे. जंगलातले काही बिबट हे उसाच्या शेतात भक्षाच्या शोधात मुक्कामाला आले आणि नवीन अधिवासात त्यांच्या गरजा भागवल्याने ते आता उसाच्या शेतात स्थिरावले आहेत, हे एक सत्य आहे. नुकतेच केंद्र शासनाने सर्व ग्रामपंचायतींना त्यांना जैवविविधता नोंदवही पीबीआर अनिवार्य केले आहे. ते जर अभ्यास पूर्ण झाले असेल तर त्यामधील नोंदी ह्या जर अचूक गेल्या गेल्या असतील तर त्यावरून देखील कराड पाटण तालुक्यातील नेमकी बिबट्यांची संख्या समजू शकेल.
बिबट्या हा उसाच्या रानात स्थिरावला आहे, त्यात त्याचे यशस्वी प्रजनन होत आहे. पिलांना माणसापासून कसे टाळायचे याचे कौशल्य ही मादी स्वतः आत्मसात करीत आहे व आता पिल्लांनाही शिकवत आहे. ऊस तोड सुरू झाली की सातत्याने स्थलांतर करावे लागते, हा काळ मादी व पिलांसाठी एक संघर्ष काळ असतो. त्यादरम्यान अनेक वेळा माणसांची संघर्ष होतो पिले मोठी होत असताना साधारणतः जन्माला आलेल्या पैकी 50% तरी जगतात व मोठी होतात व आपल्या स्वतंत्र क्षेत्र निश्चित करतात. वनविभागाने वाढत्या बिबट्यांच्या संख्येसाठी निश्चित धोरण ठरविले पाहिजे, त्याची आज नितांत गरज आहे. आज राज्यात पुणे सातारा बरोबर नाशिक, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी याचबरोबर अगदी सोलापूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात ऊस शेतीमध्ये तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रत्नागिरी मध्ये आंबा काजू भागामध्ये अनेक जिल्ह्यात बिबट्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे.
बिबट्यांची संख्या नियंत्रणासाठी गांभीर्याने विचार व्हावा…
बिबट्यांची नसबंदी हा कार्यक्रम कराड पाटण तालुक्यात व राज्यात बिबट प्रवण क्षेत्रात राबविला गेला पाहिजे का?
भविष्यात बिबट्यांची संख्या कमी करण्यासाठी वन विभागाला गांभीर्याने विचार करावा लागेल यावर शास्त्रीय अभ्यास संशोधन होणे गरजेचे आहे. हा अभ्यास होताना ज्या त्या जिल्ह्याची बिबट धारण क्षमता कॅरिंग कॅपॅसिटी किती आहे ?यावर देखील सखोल अभ्यास होणे गरजेचे वाटते. हे सर्व करण्यासाठी तज्ञ प्रशिक्षित मनुष्यबळाची वन विभागाला गरज आहे. हे काम सद्यस्थितीत असलेले वनरक्षक व वनपाल यांच्याकडे असलेल्या कामाचा ताण जो आहे त्यामध्ये त्यांच्याकडून हे काम होऊ शकत नाही. तोपर्यंत तरी लोकांना बिबट्यासोबत कसे राहायचे याचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. मोठ्या प्रमाणात प्रबोधन आपल्या जिल्ह्यात झाले पाहिजे. जसे वन विभागाचे रेस्क्यू युनिट आहे तसे बिबट्या प्रबोधन युनिट तयार झाले पाहिजे. आपण बिबट्यासोबत राहू शकतो हे सामान्य लोकांना समजावेल पाहिजे. लोकांच्या तो विश्वास वनविभागाने निर्माण करणे गरजेचे आहे.
मानव-बिबट्या संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना राबवण्याची गरज…
जर एखाद्या पाळीव जनावराची शिकार बिबट्याकडून झाली तर 48 ते 72 तासात मृत जनावरच्या मालकास नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे. बिबट्या बाबतीत असलेली भीती राग तिरस्कार हा लोकांच्या मनातून कमी करण्यासाठी वन विभागाकडून विशेष प्रयत्न झाले पाहिजे. यामध्ये सर्व प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. काही माध्यमे हे जबाबदारीने वागत नाहीत दिसला बिबट्या कि लाव बातमी हे थांबविले पाहिजे. गाव स्वच्छ असले पाहिजे भटकी कुत्री व डुक्कर जर जास्त प्रमाणात असतील तर बिबट्यांच्या त्या गावाकडे आकर्षित होण्याचा प्रसंग वाढतो. बंदिस्त गोठे दुभत्या जनावरांची संख्या वाढायला हवी व त्याचबरोबर भाकड व पाळीव जनावरांची संख्या कमी करावी. हे सर्व करण्यासाठी शासनाने एक वेगळे धोरण निश्चित केले पाहिजे तरच हा प्रश्न प्रभावीपणे सुटू शकतो.
– रोहन भाटे
मानद वन्यजीव रक्षक
तथा
सदस्य वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो.