कराडमधील या पतसंस्थेची तीनतपांची यशस्वी वाटचाल
संस्थेच्या कार्यात योगदान देणाऱ्यांचा केला विशेष गौरव
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
बँका व पतसंस्था बुडीत जात असल्याने सहकाराची बदनामी होते. ठेवीदार अडचणीत येऊ नये म्हणून ठेवी, कर्जवाटप व वसुली यांचा मेळ असला पाहिजे. तीन तपांची यशस्वी वाटचाल करणाऱ्या श्री कालिकादेवी पतसंस्थेने हे निकष पूर्ण केले आहेत. श्री कालिका कुटुंब प्रमुख मुनीर बागवान सावकार, श्री कालिका कुटुंब जनक बाळासो मोहिरे, डॉ. संतोष मोहिरे, प्रा. अशोक चव्हाण, विवेक वेळापुरे व त्यांच्या सहकार्यांनी यासाठी परिश्रम घेतले. लोकांचा विश्वास संपादन केल्यामुळेच विश्वासाने पैसा ठेवावा असा लौकिक संस्थेने मिळवला आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री आ. बाळासाहेब पाटील यांनी केले.
श्री कालिकादेवी नागरी सह. पतसंस्थेच्या ‘गौरव समारंभात’ अध्यक्षस्थानावरून आ.बाळासाहेब पाटील बोलत होते. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक प्रा.श्रीधर साळुंखे, कुटुंब प्रमुख मुनीर बागवान सावकार यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
आ. पाटील पुढे म्हणाले, अनेक सहकारी संस्था डबघाईला येत असताना श्री कालिकादेवी पतसंस्थेने तीन तपांची यशस्वी वाटचाल केली हे कौतुकास्पदच आहे. सचोटीचा कारभार, ’स्व.यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञ पुरस्कार’ व चोख व्यवस्थापन ही संस्थेची वैशिष्ट्ये आहेत , असेही त्यांनी सांगितले.
प्रा.श्रीधर साळुंखे म्हणाले, मोठ्या उत्साहाने उभ्या राहिलेल्या सहकारी संस्था काळाच्या ओघात डबघाईला येतात. माणसं माणसांपेक्षा पैशावर जास्त विश्वास ठेवू लागली आहेत. या संस्थेकडे असणाऱ्या १५० कोटी रुपयांच्या ठेवी म्हणजे ठेवीदारांचा विश्वास आहे. या विश्वासामुळेच संस्थेने तीन तपांची वाटचाल पूर्ण केली आहे.
या समारंभात श्री कालिका कुटुंब जनक म्हणून गजानन उर्फ बाळासो मोहिरे, माजी चेअरमन डॉ. संतोष मोहिरे, प्रा. अशोक चव्हाण, डॉ. जयवंत सातपुते, कार्यलक्षी संचालक विवेक वेळापुरे, संस्थापक संजय मोहिरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
संस्थेचे माजी उपाध्यक्ष स्व.जयवंतराव जाधव, स्व.जयंतीलाल भंडारी, स्व.महेश त्रिभुवणे, स्व.शांताराम वेळापुरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्रीमती जयाराणी जाधव, मनोज भंडारी, श्रीमती वनिता त्रिभुवणे, श्रीमती सुमन वेळापुरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास संचालक अरुण जाधव, अनिल सोनवणे, राजन वेळापुरे, शरदचंद्र देसाई, सीमा विभूते, राजेंद्र यादव, सुरेश भंडारी, पारस विजापुरे, औदुंबर कासार, मारुती सावंत, संतोष भामरे, किरण लखापती, शिरिष गोडबोले, राजेंद्र साठे, प्रमोद चतुर व सहकार क्षेत्रातील मान्यवर, सभासद, ठेवीदार उपस्थित होते.