
चांगभलं ऑनलाइन | मुंबई प्रतिनिधी
शरद पवार यांना त्यांच्या 63 वर्षाच्या राजकारणात आत्तापर्यंचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या हातून राष्ट्रवादी पक्ष तसेच चिन्हही गेलं आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाचा ताबा आणि पक्ष चिन्ह अजित पवार गटाला दिलं आहे.
निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूंचे पुरावे पडताळणी केल्यानंतर आणि युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर हा निर्णय जाहीर केला आहे. राज्यसभा आणि लोकसभा निवडणुका तोंडावर असताना हा निर्णय झाल्याने आता शरद पवार पुढे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
निवडणूक आयोगाच्या या निकाविरूध्द शरद पवार सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात. त्यांच्या गटाकडून आता पक्ष आणि चिन्हासाठी कोर्टात धाव घेतली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र कोर्टात या प्रकरणाचा निकाल कधी लागेल हे सांगता येणार नाही. त्यामुळे शरद पवार गटाला पक्ष आणि चिन्ह वेगळं घेऊनच राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. त्याचा फटका निवडणुकीत बसूही शकतो.
अजित पवारच अध्यक्ष राहणार…
राष्ट्रवादी पक्ष आणि निवडणूक चिन्ह अजित पवार यांच्या गटाकडे आल्याने अजितदादाच आता पक्षाचे अध्यक्ष राहणार आहेत. त्यांच्याकडे सर्वाधिकार जातील. तसेच पक्षाचे प्रतोदपद सुध्दा अजित पवार गटाकडेच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे सध्या तरी शरद पवार गटाला अजित पवार गटाचा व्हीप पाळावा लागेल, अन्यथा शरद पवार गटाचे आमदार आणि खासदाही अपात्र होऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे.
शरद पवार यांना नवीन चिन्ह मिळणार…
दरम्यान, शरद पवार गटाला नवीन चिन्ह आणि पक्षाचे नवीन नाव सूचवावे लागणार आहे. त्याची पडताळणी करून निवडणूक आयोग शरद पवार गटाला नवीन चिन्ह आणि पक्षाचे नाव प्रदान करेल, असे एका आघाडीच्या दूरचित्रवाणी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.