काही कारखान्यांचा परवाना गुळ पावडरीचा पण विकतात साखर
सह्याद्रीच वाईट चिंतेल त्याचं काही खरं नाय : आ. बाळासाहेब पाटील

कराड | प्रतिनिधी
राज्यात पंधरा ते वीस कारखाने असे आहेत की ते गुळ पावडर तयार करतात. त्यांचा परवाना गुळ पावडरीचा आहे पण अनाधिकृतरित्या ते साखरेचा प्लांट तयार करून साखर निर्मिती करतात आणि साखर विकतात हे बेकायदेशीर आहे. पण ज्याच्या हाती सत्ता तो पारधी असा हा प्रकार आहे. शेवटी कोणी काही करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण एकच सांगतो की जो ‘सह्याद्री’चं वाईट चिंतील त्याचं काही खरं नाही, असा सज्जड इशारा माजी सहकार मंत्री, आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिला.
यशवंतनगर ता.कराड येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या ५० व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी राज्य लेखा समितीचे अध्यक्ष शहाजीराव क्षिरसागर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, पंचायत समितीचे माजी सभापती देवराज पाटील, राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या सरचिटणीस सौ. संगीता साळुंखे, कारखान्याच्या उपाध्यक्षा सौ. लक्ष्मीताई गायकवाड,माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पवार, माजी नगराध्यक्ष आनंदराव कोरे ,माजी सभापती प्रणव ताटे, माजी सनदी अधिकारी तानाजी सांळुखे, युवा नेते जशराज पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कारखान्याच्या सन २०२३-२४ या ५० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन आ. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या संपन्न झाला.
आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, आजकाल दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रात पिकवलेला ऊस आणून त्याचे गाळप करून साखर कारखाने चालवले जात आहेत. पण सह्याद्री हा असा एकमेव कारखाना आहे की जो स्वतःच्या कार्यक्षेत्रात पिकवलेल्याच उसाचे गाळप करतो. सह्याद्री हा सहकारी तत्त्वावर चालणारा आणि सभासदांचे हित जोपासणारा साखर कारखाना आहे. आम्ही सभासद हिताला सर्वोच्च प्राधान्य देत आलो आहे, त्यामुळे सह्याद्रीकडे येत असताना ऊस भरून जर एखादा ट्रॅक्टर उलट्या दिशेने चालल्याचं दिसलं तर खूप वाईट वाटतं. शेवटी ऊस कोणाला घालायचा हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे, पण नैतिकता पाळून आपण सह्याद्रीलाच ऊस घातला पाहिजे असे आवाहन आमदार बाळासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांना केलं. घाईघाईने ऊस घालण्याच्या नादात शेतकरी नंतर आर्थिकदृष्ट्या अडचणीत येतो, असेही ते म्हणाले.
साताऱ्याचं हक्काचं पाणी दुसरेच पळवत आहेत…
यंदा साखरेचे प्रमाण कमी असून साखरेला चांगला दर मिळेल, त्याचा जास्तीचा फायदा सभासदांना मिळेल, असे सांगून आमदार बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले की, राज्यात विशेषता सातारा जिल्ह्यात येणाऱ्या काळात मोठी दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार आहे. मात्र तुम्ही म्हणाल की पाऊस न पडल्यामुळे ही परिस्थिती निर्माण होईल तर ते अर्धसत्य असणार आहे. कारण सातारा जिल्ह्यातल्या धरणांचं आपल्या हक्काचं पाणी सत्तेचा वापर करून इतर काही जण पळवत आहेत, त्यामुळे आपल्याकडे दुष्काळी परिस्थिती वाढणार आहे. मग ते धोम कण्हेर धरण असो किंवा कोयना धरण असो. 26 टीएमसी पाणी हे पिण्याच्या पाण्याच्या करारानुसार इतरांना द्यावं लागतं, हा कोयनेचा एक वीक पॉईंट राहिला आहे. फक्त त्यावर वीज तयार करण्यात येते, एवढाच प्लस पॉइंट.
यंदाच्या हंगामात २१५७६.२१ उसाची नोंद सह्याद्रीकडे झाली असून प्रतिदिनी ११ हजार मे. टन गाळपाचे उद्दिष्ट असून ऊस तोडणीसाठीची सर्व वाहतूक यंत्रणा सज्ज झाली आहे. या हंगामात डिस्टलरी चालू राहणार असून इथेनॉलचे पूर्ण क्षमतेने उत्पादन घेणार आहे.त्याचा जास्तीचा फायदा सभासदांना होणार आहे.तेंव्हा सभासद शेतकऱ्यांनी खाजगी कारखान्यांच्या दिखाऊ प्रलोभनाला बळी न पडता आपला ऊस सह्याद्रीलाच घालून आपले हित जोपासावे असे आव्हान करून पन्नासाव्या सुवर्ण महोत्सवी गळीत हंगाम शुभारंभाचा बहुमान मला मिळाला हे आपले भाग्य समजतो , असं आ. पाटील यांनी आवर्जून सांगितलं.
देवराज पाटील म्हणाले, सभासदांचे हित ओळखून त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून या कारखान्याची उभारणी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या प्रेरणेने व संस्थापक आदरणीय स्वर्गीय पी डी पाटील साहेब यांच्या दूरदृष्टीतून झाली आहे. उत्कृष्ट नियोजनामुळे सह्याद्रीला विविध पुरस्कार मिळाले आहेत. सहकार क्षेत्राला चांगले दिवस आले आहेत.
सह्याद्रीच्या सुवर्ण पानांची डॉक्युमेंटरी व्हावी…
गेल्या पन्नास वर्षात सह्याद्रीने कार्यक्षेत्रात शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले असून असंख्य हाताला रोजगार दिले. आज अमृत महोत्सवी टप्पा यशस्वीरित्या पूर्ण करणे हे सहकारातील फार मोठे योगदान आहे. सहकारातील सह्याद्री हा एक दीपस्तंभ असून देशपातळीवर अनेक पारितोषकांनी गौरवलेल्या सह्याद्रीची कारकीर्द कराड उत्तरसाठी अभिमानास्पद असून सह्याद्रीच्या दैदिप्यमान वाटचालीची सोनेरी पाने पुस्तक रूपात यावीत. सह्याद्रीने डॉक्युमेंटरी तयार करून इतरांना दिशादर्शकाची भूमिका बजवावी, असे मत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी व्यक्त केले.
प्रास्ताविक कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी केले. सूत्रसंचालन दादासो पाटील यांनी केले तर आभार सह्याद्री कारखान्याचे संचालक मानसिंगराव जगदाळे यांनी मांनले.
यावेळी आजी-माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, आजी माजी संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.