
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
सातारा लोकसभेचे इंडिया आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा समन्वयक व कराडचे माजी नगरसेवक इंद्रजित गुजर यांच्या नेतृत्वाखाली कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात शिवसैनिकांची फळी सक्रिय झाली आहे. कराड दक्षिणमधून आमदार शिंदे यांना मताधिक्य देणार असल्याची ग्वाही इंद्रजित गुजर यांनी दिली.
शुक्रवारी आमदार शशिकांत शिंदे यांनी गुजर हॉस्पिटलला भेट दिली यावेळी इंद्रजित गुजर यांच्यासह त्यांच्या शेकडो समर्थकांनी आमदार शिंदे यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी जिल्हाध्यक्ष हर्षद कदम व माजी नगरसेवक उपस्थित होते. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात इंद्रजित गुजर यांनी खासदार संजय राऊत यांच्या मार्गदर्शनानंतर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर इंद्रजित गुजर यांनी कराड शहरासह दक्षिण विधानसभा मतदारसंघात शेकडो तरुणांना शिवसेनेत सहभागी करून घेतली आहे. आमदार शशिकांत शिंदे यांना इंडिया आघाडीचे उमेदवारी मिळाल्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षाने कराड दक्षिणमधून आमदार शिंदे यांच्या मताधिक्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार केला आहे.
दरम्यान, आमदार शिंदे यांनी बनवडी येथे शिवसेना ठाकरे पक्षाच्या मेळाव्यास मार्गदर्शन केले. यावेळीही इंद्रजित गुजर यांनी शिंदे यांच्या विजयासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.