रोटरी क्लबकडून विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान
जागतिक महिला दिनानिमित्त रोटरीयन महिला सदस्यांनी चालवले कामकाज

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ कराड यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून महिला सक्षमीकरण उपक्रमांतर्गत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर रोटरी क्लब ची आठवड्याची मीटिंग ही महिला सदस्यांचे नेतृत्वाखाली घेतली गेली. रोटरी क्लबच्या या अनोख्या उपक्रमाचे विविधस्तरावरून कौतुक होत आहे.
येथील रोटरी ऍक्टिव्हिटी सेंटर मध्ये रोटरी क्लब ऑफ कराड यांच्यावतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित महिला सन्मान सोहळ्यास डॉ.सविता मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रोटरी क्लब कराडचे अध्यक्ष रामचंद्र लाखोले, सचिव आनंदा थोरात, खजिनदार किरण जाधव यांच्यासह महिला दिनानिमित्त क्लबचे महिला नेतृत्व म्हणून क्लब अध्यक्षा डॉ.अस्मिता फासे, सचिव डॉ.रूपाली देसाई, खजिनदार डॉ.श्रुती शहा, अनुराधा टकले यांचे उपस्थिती होती.
यावेळी रेखा प्रदीप कांबळे, राधिका जयंत कदम, सुवर्णा सूर्यकांत खराडे, अस्मिता शेखर असळकर, वैशाली प्रकाश पाटील यांचा रोटरी सन्मान चिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींची ओळख पल्लवी यादव, डॉ.भाग्यश्री पाटील, अर्चना कोगणूळकर, मधुराणी थोरात व डॉ.शुभांगी पाटील यांनी करून दिली.
डॉ.सविता मोहिते म्हणाल्या, महिला ही अबला नसून सबला आहे. महिला म्हणजे केवळ एक नातं नाही, तर ती संपूर्ण जगाचा आधार आहे. सर्व महिलांनी सशक्तीकरणासाठी आणि समाजातील परिवर्तनासाठी सतत कार्यरत राहणे गरजेचे आहे. आपण सर्वांनी महिलांच्या योगदानाचा सन्मान करून त्यांच्या कर्तृत्वाला नवी दिशा देण्याचे कार्य केले पाहिजे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. त्या घर सांभाळून वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या कामाचा गौरव झाला की त्यांचा उत्साह वाढतो. शाब्बासकीची थाप पाठीवर मिळाली की आणखीन प्रगती करण्यासाठी प्रेरणा मिळते.
सचिव डॉ.रुपाली देसाई यांनी आभार मानले. यावेळी रोटरी क्लबचे विविध प्रकल्पाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
रोटरीयन महिला सदस्यांनी चालविले कामकाज
जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ कराड ची आठवडा मिटिंग ही महिला सदस्यांनी घेतली. क्लब अध्यक्षा डॉ.अस्मिता फासे, सचिव डॉ.रूपाली देसाई, खजिनदार डॉ.श्रुती शहा, अनुराधा टकले यांनी काम पाहिले. शआठवड्यात झालेल्या प्रकल्पाची माहिती देऊन नियोजित प्रकल्पांची माहिती डॉ.अस्मिता फासे यांनी दिली. यावेळी नियोजित प्रकल्प बाबत सदस्यांशी चर्चा करण्यात आली. फोरवे टेस्ट डॉ.शुभांगी पाटील यांनी घेतली.