चांगभलं ऑनलाइन | वडीगोद्री
ओबीसी आरक्षण बचावाची भूमिका घेऊन अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे बेमुदत उपोषणाला बसलेल्या ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांची प्रकृती खालावली आहे. हाके यांचा रक्तदाब वाढत असल्याने त्यांना पक्षघाताचा व हृदयविकाराचा धोका असल्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, कायदा हातात घेऊ नका, गुन्हे दाखल करून घेऊ नका, असं आवाहन त्यांनी राज्यातील ओबीसी बांधवांना केलं आहे.
ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याची सरकारने लेखी हमी द्यावी यासह इतर मागण्यांसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे हे वडीगोद्री येथे उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा सातवा दिवस आहे. त्यांचे प्रकृती तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांना १७८ इतका हाय बीपी असल्याचे सांगितले असून त्यांचे वजन 83 किलो वरून 75 किलो पर्यंत खाली आले असल्याचे सांगितले. उच्च रक्तदाबामुळे हाके यांना पक्षघाताचा व हृदयविकाराचा धोका उद्भवू शकतो, अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. मात्र आज सातव्या दिवशी हाके व वाघमारे यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, असा निर्धार हाके यांनी केला आहे.
हाके यांच्या उपोषणाची राज्य शासन दखल घेत नसल्याचे कारण सांगत ओबीसी समाजाने जालना येथे टायर जाळून रास्ता रोको केला होता. याप्रकरणी आंदोलकांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यावर असा कायदा हातात घेऊ नका, गुन्हे दाखल करून घेऊ नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे, असे आवाहन हाके यांनी केले आहे. रास्ता रोको करायचा असता तर उपोषणाला बसलोच नसतो , असेही त्यांनी म्हटले आहे.
कोणाचं खरं समजायचं…
एकीकडे मनोज जरांगे सांगतात की आम्ही शंभर टक्के ओबीसी आरक्षणात घुसलोय तर दुसरीकडे शासन म्हणते की ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. त्यामुळे नेमकं कोणाचं खरं समजायचं? असा प्रश्न हाके यांनी उपस्थित केला आहे.
आमच्या अन्नात त्यांचे माती कालवण्याचे काम…
गरीब मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालं तरच न्याय मिळेल, असं कसं म्हणता येईल. आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. सरकार मुख्य मुद्दा दुर्लक्ष करत आहे. ओबीसी मधून आरक्षण मिळाल्यानंतरच मराठा समाजाला न्याय मिळतो असे सांगणारे जरांगेचे सल्लागार कोण आहेत? असा सवाल हाके यांनी उपस्थित केला आहे. जरांगे हे भुजबळांना शिव्या घालत आहेत तर दुसरीकडे आम्हाला भाऊ म्हणत आमच्या अन्नात माती कालवण्याचे त्यांचे काम सुरू आहे, अशी टीका हाके यांनी जरांगे यांच्यावर केली आहे.
सरकार आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे….
शासनाने आमच्या आंदोलनाची दखल घ्यायला हवी होती. मात्र आम्ही मोठे बॅकग्राऊंड असलेले कार्यकर्ते नाही. आम्ही राजकीय चेहरा असलेले कार्यकर्ते नाही. त्यामुळे शासनाला आमची दखल घ्यावी वाटत नाही. पण किमान व्हीजेएनटी ओबीसींची बाजू तरी शासनाने समजून घ्यावी. फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात ओबीसी कायम फेसलेस राहिला आहे, असे हाके यांनी म्हटले आहे.
विविध नेते उद्या भेटणार…
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड हे ओबीसी आंदोलन स्थळी भेट देणार आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे आंदोलन स्थळी उद्या भेट देण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं काय…
दरम्यान , मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करायचा, आंदोलन करायचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र सुरू असलेले ओबीसी आंदोलन हे सरकार पुरस्कृत असल्याची जोरदार टीका केली आहे. सगळं ठरवून चाललं आहे, पहिल्या आंदोलनात आणि आत्ताच्या आंदोलनात खूप फरक आहे. एका मागोमाग एक नेते भेटायला जात आहेत, ही राजकीय नेत्यांची चळवळ आहे, अशी बोचरी टीका मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी आंदोलनावर केली आहे.