तांबवे, कोळे, मलकापुर ता.कराड येथुन चोरीस गेलेल्या 3 मोटारसायकल विधीसंघर्षग्रस्त बालकांकडुन जप्त ; कराड तालुका डीबी पथकाची कारवाई.

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
तांबवे, कोळे, मलकापुर ता.कराड येथुन चोरीस गेलेल्या 3 मोटारसायकल विधीसंघर्षग्रस्त बालकांकडुन कराड तालुका डीबी पथकाने हस्तगत करून जप्त केल्या आहेत.
पोलिसांकडील माहिती अशी, पोलीस अधिक्षक समीर शेख तसेच अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल , उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर कराड यांनी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी सातारा जिल्ह्यातील सर्व अधिकारी यांना मिटींगमध्ये सुचना व मार्गदर्शन केले होते. दरम्यान , दिनांक 22.02.2024 रोजीचे रात्रौ 10.00 ते दिनांक 23.02.2024 रोजीचे सकाळी 07.00 वा. चे सुमारास मौजे तांबवे ता. कराड येथुन राहत्या घरासमोरुन अंगणातुन प्लेझर मोटारसायकल क्रमांक MH 50 T 9868 ही मोटर सायकल अज्ञात चोरटयाने मुद्दाम लबाडीने चोरुन नेलेबाबत अज्ञात चोरटया विरोधात प्रकाश पंढरीनाथ सुतार रा. तांबवे ता. कराड जि.सातारा यांनी कराड तालुका पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती.
उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर व पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप (कराड तालुका पोलीस ठाणे) यांचे सुचनेनुसार गुरूवार, दि.29/02/2024 रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अमंलदार नितीन येळवे, सज्जन जगताप, सचिन निकम, उत्तम कोळी, प्रफुल्ल गाडे, सहा.पो.उपनिरीक्षक प्रदीप कांबळे यांना मिळाले बातमीनुसार विंग ता. कराड येथे सापळा लावला असता, एक प्लेजर मोटारसायकल वरुन 3 विधीसंघर्षग्रस्त बालकांना जात असताना संशयीतरित्या पकडले. पोलीस स्टेशन अभिलेखावर खात्री करुन, त्यांना पोलीस स्टेशनला आणुन विश्वासात घेवुन विचारपुस केली असता सदरची प्लेझर मोटारसायकल क्रमांक MH 50 T 9868 ही तांबवे येथुन दि. 22/02/2024 रोजी चोरी केलेचे त्यांनी कबुल केले असुन त्याबाबत कराड तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा नंबर 129/2024 भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंद आहे. तसेच त्यांचेकडुन कोळे येथील बैलगाडी शर्यती मधील पार्किंगमधुन चोरी केलेली बजाज प्लॅटीना मोटारसायकल क्रमांक MH 10 AP 6723 व मलकापुर नगरपालिकाजवळुन चोरी केलेली एच एफ डिलक्स मोटारसायकल MH 50 F 6650 या दोन मोटारसायकली अशा 1 लाख ,55 हजार रुपये किंमतीच्या तीन मोटरसायकली हस्तगत करुन जप्त करण्यात पोलिसांना यश आले.
जप्त केलेल्या चोरीच्या मोटरसायकलींमध्ये – कराड तालुका व कराड शहर हद्दीतून चोरी झालेल्या MH 50 F 6650 एचएफ डिलक्स, MH 50 F 6650 प्लेजर मो.सा, MH 10 AP 6723 बजाज प्लॅटीना अशा दुचाकींचा समावेश आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक. समीर शेख तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आचंल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, तसेच पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, ( कराड तालुका पोलीस ठाणे) यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार नितीन येळवे, सज्जन जगताप, सचिन निकम, उत्तम कोळी, प्रफुल्ल गाडे, कोळे ओपीचे सहा.पो.उपनिरीक्षक प्रदीप कांबळे यांनी केली असुन पुढील तपास पो. हवा. नितीन येळवे हे करीत आहेत.