मेंढपाळाचं पोरगं एमपीएससीमध्ये राज्यात प्रथम ; माणदेशाच्या कन्येचीही एमपीएससीत उत्तुंग भरारी – changbhalanews
राज्यशैक्षणिक

मेंढपाळाचं पोरगं एमपीएससीमध्ये राज्यात प्रथम ; माणदेशाच्या कन्येचीही एमपीएससीत उत्तुंग भरारी

चांगभलं ऑनलाइन | सातारा प्रतिनिधी
लॉकडाऊनमध्ये कंपनी बंद पडल्याने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या अमोलची नोकरी गेली. त्यानंतर त्याने थेट गाव गाठले. आणि एमपीएससीतून अधिकारी होण्याचे ध्येय बाळगून तो परत पुण्याला परतला, दिवस रात्र अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी मध्ये राज्यात प्रथम येऊन त्याने माणदेशाचा झेंडा रोवला. त्याने थेट पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.
माण तालुक्यातील दिवड हे अमोलचे गाव. अमोल भैरवनाथ घुटुकडे असे त्याचे नाव आहे.

दरम्यान, माणदेशची कन्या पूजा दीपक भागवत हिनेही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परिक्षेत यश मिळवून राज्याच्या संभाजीनगर जलसंपदा विभागात मोजणीदार पदाला गवसणी घातली आहे. दुष्काळी माण तालुक्यातील विद्यार्थी या विद्यार्थ्यांनी नैसर्गिक दुष्काळ असला तरी बुद्धीचा सुकाळ माण तालुक्यात कायम असल्याचे दाखवून दिले आहे.

अमोल घुटुकडे याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण दिवड येथे, तर बारावीचे शिक्षण म्हसवड येथे झाले आहे. अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण त्याने बुधगाव (जि. सांगली ) येथील वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे पूर्ण केले. या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत असताना कॅम्पसमधून मुंबई येथे अमोलला नोकरी मिळाली. मात्र, कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे कंपनी बंद पडली आणि नोकरीही गेली. त्यानंतर अमोल याने मुंबईहून थेट गाव गाठले. मुळातच अभ्यासात हुशार असलेल्या अमोलने तेथे गेल्यानंतर एमपीएससीचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. आपण ही परीक्षा सहज उत्तीर्ण होऊ असा त्याला आत्मविश्वास निर्माण झाला. त्यानंतर त्याने दिवडहून थेट पुणे गाठले. पुणे येथे आल्यानंतर त्याने एमपीएससीचा अभ्यास करण्यासाठी क्लास लावला आणि पहिल्या यशातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्पर्धा परिक्षेतून पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घालत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्याच्या यशामुळे सातारा जिल्ह्यासह माण तालुक्याचा ‘माण’ महाराष्ट्रात वाढला आहे.

अमोल यांचे दिवस गाव हे म्हसवडपासून पाच किलोमीटर अंतरावर असून साधारण दीड हजार लोकसंख्या आहे. त्याचे आई-वडील धनगर कुटुंबातील असून या कुटुंबाला दोन एकर जमीन आहे. शेतीबरोबरच ते मेंढपाळ आहेत. अमोलच्या मोठ्या भावाचे इंजिनिअरिंगचे तर बहिणीचे डीएड पर्यंत शिक्षण झाले असून ती विवाहित आहे. आई- वडिल अशिक्षित असून तिन्ही मुलांना त्यांनी जिद्दीने शिक्षण दिले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परिक्षेत येथील पूजा दीपक भागवत हिची राज्याच्या संभाजीनगर जलसंपदा विभागात मोजणीदार पदावर निवड झाली.

अमोल घुटुकडे व पूजा भागवत यांनी मिळविलेल्या यशाबद्दल माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, म्हसवड पालिकेचे माजी नगराध्यक्ष दत्तोपंत भागवत, अहिंसा पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन दोशी, कांतामामा रसाळ, विनोद रसाळ, पटेल कन्ट्रक्शनचे संचालक स्थापत्य अभियंता सद्दाम चोपदार- पटेल, माजी नगरसेविका शोभाताई लोखंडे याचबरोबरोबरच देवांग समाजावतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

आतापर्यंत आमच्या भावकीमध्ये असं मोठ्या पदाला गवसणी घालणार कोणी नव्हतं. मात्र, अमोलने ते करून दाखवलं. त्याने जिद्दीने अभ्यास करून हे यश मिळवलं याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या कष्टाचं, कुटुंबाचं त्याने सार्थक केलं. यापुढेही त्याने जिद्दीने अभ्यास करून चांगले यश मिळवून उच्च पदस्थ व्हावे, हीच आमची इच्छा आहे.
– भैरवनाथ घुटुकडे (अमोलचे वडील)

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close