चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
छत्रपती शिवरायांचा स्त्रीयांविषयीचा दृष्टिकोन प्रत्येकाने ठेवला तर समाजापुढे एक आदर्श निर्माण होईल आणि महिलांना आपोआपच सन्मान मिळेल. स्त्रियांना त्यांच्या क्षमतांची, त्यांच्या हक्कांची जाणीव करून देऊन त्यांच्यात आत्मसन्मान निर्माण केल्यास ‘ती’ उंच भरारी घेण्यास सज्ज होईल असा विश्वास व्यक्त करून त्यांच्या कर्तृत्वामुळे माझ्या लेकीबाळींना लोकमान्यता मिळावी असे उद्गार खासदार श्रीनिवास पाटील यांनी काढले.
सातारा येथे श्रीनिवास पाटील फाउंडेशन व युवा ३६०° आयोजित ‘कृषीलक्ष्मी साताऱ्याची’ महिला शेतकरी सन्मान व गुणगौरव पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीच्या विश्वस्त सौ.सुनंदाताई पवार, राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, जिल्हा कृषि अधिक्षका भाग्यश्री फरांदे, श्रीनिवास पाटील फांऊडेशनच्या उपाध्यक्षा रचनादेवी पाटील, ॲड. वर्षाताई देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, आजची स्त्री पुरुषांच्या बरोबरीने नोकरी करीत आहे, प्रत्येक कामात हातभार लावत आहे. प्रत्येक क्षेत्रातील त्यांचे योगदान अभिमानाची बाब असली तरी गाव, खेडे, झोपडपट्टी, शहरांचा काही भाग बघितला की मन अस्वस्थ होते. महिलांना योग्य वागणूक देणे, तिच्या कतृत्वाला प्रोत्साहन देणे म्हणजेच तिचा सन्मान करणे होय.
महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजा राममोहन रॉय आदींनी स्त्रीमुक्तीची चळवळ सुरू केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात स्त्रीला समानतेचा अधिकार बहाल केला. आपापल्या परीने महिलांचा विकास, हा ध्यास घेऊन कार्य करणे महत्त्वाचे आहे. तशी सुरुवात स्वत:पासून करणे गरजेचे आहे.
सारंग पाटील म्हणाले, श्रीनिवास पाटील फाउंडेशन प्राधान्याने ग्रामिण भागातील विद्यार्थी आणि महिला यांच्यासाठी काम करत आहे. सध्या मुली शिक्षणात अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे, त्याचा आनंद आहे. घरातील लक्ष्मीच्या परिश्रमाची किंमत कशातही मोजता येणार नाही. त्यामुळे स्त्रीला कौटुंबिक, सामाजिक जीवनात मानाचे स्थान मिळावे.
दरम्यान श्रीनिवास पाटील फाउंडेशनच्या वतीने स्व.सौ.रजनीदेवी पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा पहिला ‘स्व.सौ.रजनीदेवी श्रीनिवास पाटील-स्मृती क्रीडा पुरस्कार-२०२४’ हा आंतरराष्ट्रीय तिरंदाज पटू सुवर्णकन्या अदिती गोपीचंद स्वामी हिला खा.श्रीनिवास पाटील यांच्याहस्ते यावेळी देण्यात आला.
प्रारंभी स्वागत रचनादेवी पाटील यांनी केले. आभार प्रसाद नेहे यांनी मानले. कृषि क्षेत्रात नाविन्यपूर्ण विविध प्रयोग करून इतरांसाठी मार्गदर्शक ठरणार्या जिल्ह्यातील विविध शेतकरी महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला. यावेळी सविता ओरा, अल्पना यादव, संजना जगदाळे, अनिता जाधव, रजनी पवार, मेघाताई नलवडे, समिंद्रा जाधव, उर्मिला कदम, मनिषा पाटील, छायाताई शिंदे आदींसह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
पुरस्काराने महिला गहिवरल्या…
संसाराचा गाडा हकताना अपार कष्ट उपसणारी स्त्री शेतातही राबत असते. आजच्या एकविसाव्या शतकात प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांचा सक्रिय सहभाग आहे आणि त्याचे कौतुक देखील केले जाते. मात्र पिढ्यान् पिढ्या कृषि क्षेत्रात स्त्रियांचा मोठा सहभाग असून देखील त्यांचे विशेष कौतुक केले जात नाही. अशा कष्टकरी, शेतकरी महिलांचा सत्कार सोहळा जाणीवपूर्वक आयोजित करून श्रीनिवास पाटील फाउंडेशनने त्यांच्या कष्टाला दाद दिल्याने उपस्थित माता-भगिनींना गहिवरून आले.