कराड शहरात गुन्हेगारी टोळ्यांच्या हस्तकावर पोलिसांची कारवाई सुरू ; सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त!

कराड प्रतिनिधी , दि. ८ | चांगभलं वृत्तसेवा
कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने शहर परिसरातील गुन्हेगारी टोळ्यांच्या पुस्तकावर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयित जीवन शांताराम मस्के (वय ३०, रा. शुक्रवार पेठ, कराड) याला अटक करून त्याच्या ताब्यातील देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केले आहे. या कारवाई ६६ हजार रुपये किंमतीचा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. संशयित जीवन मस्के हा कराड शहर परिसरातील एका नामांकित गुन्हेगारी टोळीशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, कराडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील, तसेच कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजु ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक भापकर व त्यांच्या पथकाने मलकापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सापळा रचून ही कारवाई केली. संशयित आरोपी जीवन मस्के हा कराड शहर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील संशयित असून त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल व १ जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान करण्यात आली असून कराड शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचा बिमोड करण्याच्या पोलिसांच्या मोहिमेचा एक भाग आहे.
कारवाई करणाऱ्या पथकामध्ये कराड शहर पुणे प्रकटीकरण शाखेचे सपोनि अशोक भापकर, पो.उ.नि. सतिश आंदेलवार, हवालदार संतोष पाडळे, सज्जन जगताप, अनिल स्वामी, संदीप कुंभार, धीरज कोरडे, अमोल देशमुख, आनंदा जाधव, मोहसिन मोमीन, दिग्विजय सांडगे, संग्राम पाटील, मुकेश मोरे, सोनाली पिसाळ यांचा समावेश होता.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारवाईला महत्व…
कराड शहर परिसरात गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान कराड पोलिसांच्या समोर असते. यंदा पोलिसांनी गणेशोत्सव सुरळीत पार पडावा यासाठी विविध उपायोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहर परिसरातील अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या गुंडांच्या मुसक्या आवळण्याचं काम पोलिसांनी हाती घेतलं आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी केलेली ही कारवाई गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची ठरणारी आहे.