डी-मार्टमध्ये बिल मराठीत द्या; अन्यथा ‘खळ-खटयाक’ आंदोलन – मनसेचा १५ दिवसांचा अल्टीमेटम

कराड प्रतिनिधी, दि. १६ | चांगभलं वृत्तसेवा
कराड तालुक्यातील मलकापूर येथील डी-मार्टमध्ये ग्राहकांना इंग्रजीत बिल दिले जात असल्यामुळे मराठी भाषिक नागरिकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) १५ दिवसांचा अल्टीमेटम देत, “मराठीत बिलिंग नाही तर मनसे स्टाईलने खळ-खटयाक आंदोलन करू” असा थेट इशारा आज दिला.
यासंदर्भात डी-मार्टचे स्टोअर मॅनेजर नागेश नागरेड्डी यांना निवेदन देण्यात आले. मनसेचे जिल्हाप्रमुख अॅड. विकास पवार, तालुका प्रमुख दादासाहेब शिंगण, शहर प्रमुख सागर बर्गे यांच्या नेतृत्वाखाली नितीन महाडीक, संजय मंडलीक, शंभूराज भिसे, संभाजी चव्हाण, योगेश जाधव, अरुण मदने, संभाजी पवार, संभाजी सकट, आकाश नलवडे आणि इतर मनसैनिक यावेळी उपस्थित होते.
अॅड. विकास पवार म्हणाले, “कराड-मलकापूर परिसरातील ग्रामीण भागातून ग्राहक मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी डी-मार्टमध्ये येतात. मात्र बिलिंग इंग्रजीत असल्याने अनेकांना बिल समजत नाही. महाराष्ट्रात व्यवसाय करताना मराठी भाषेला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. डी-मार्टने राज्यभर ही सुधारणा करावी.”
ते पुढे म्हणाले की, “ग्राहक जर एखाद्या कर्मचाऱ्याच्या वर्तनाची तक्रार करू इच्छित असतील, तर इंग्रजीत असलेल्या नेमप्लेटमुळे अडचण होते. त्यामुळे नेमप्लेटसुद्धा मराठीत हव्यात.”
मनसेच्या दबावाने नेमप्लेट मराठीत…
मनसेचे पदाधिकारी डी-मार्टमध्ये निवेदन देण्यासाठी येणार असल्याची खबर लागताच डी-मार्ट प्रशासनाने तत्काळ हालचाली केल्या. सर्व कर्मचाऱ्यांच्या नेमप्लेट मराठीत करण्यात आल्या. हे दृश्य पाहून मनसे पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
“नेमप्लेटप्रमाणेच बिलही मराठीत द्या. नाहीतर आंदोलन अटळ आहे,” असा इशारा मनसेने दिला आहे. आगामी काळात ही मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, हे स्पष्ट करण्यात आले.