“दहशतवादावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न, वक्तव्याचा विपर्यास करून राजकारण!” — पृथ्वीराज चव्हाणांचा स्फोटक आरोप

कराड प्रतिनिधी, दि. ३ | चांगभलं वृत्तसेवा
“दहशतवादाला कोणताही जात, धर्म, रंग नसतो… हे मी स्पष्ट सांगितले होते, पण त्या विधानाचा सोयीस्कर अर्थ काढून माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आणि मूळ मुद्द्यावरून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न झाला,” असा रोखठोक आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
एनआयएच्या निकालावरून सध्या सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया देताना त्यांनी स्पष्ट केलं की, “आंदोलन करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे, पण मुद्दा नेमका काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे.”
“एनआयए ही राष्ट्रीय तपास संस्था आहे. 2014 पासून अमित शहा यांच्या निदर्शनात या प्रकरणाचा तपास सुरू होता. कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की पुरावा अपुरा आहे, म्हणून दोषींना शिक्षा देता आली नाही. कोर्ट म्हणालं ब्लास्ट झाला हे खरं, पण कोणी केला याचा निष्कर्ष दिला नाही,” असे ते म्हणाले.
चव्हाण पुढे म्हणाले की, “दहशतवाद हा निष्पापांचा जीव घेतो. त्याला धर्माचे लेबल लावणे चुकीचे आहे. राजकीय हेतूने तपास यंत्रणांचा वापर होतोय का, हे तपासायला हवं. वरच्या न्यायालयात दाद मागणं हे योग्य पाऊल ठरेल.”
मालेगाव स्फोट प्रकरणावर बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितले की, “मुख्यमंत्री यावर बोलणार नाहीत, कारण त्यांना दिल्लीची परवानगी लागते. या सगळ्या यंत्रणा केंद्राच्या अधिपत्याखाली आहेत.”
तसेच उद्योगधंद्यांवर बोलताना ते म्हणाले, “बीडची घटना केवळ दोन कोटींची खंडणी दिली नाही म्हणून घडली. पुण्याच्या प्रकल्पातही असेच खंडणीचे प्रकार सुरू आहेत. खंडणीखोरांना राजाश्रय असल्याशिवाय ते इतक्या बिनधास्तपणे अशी कृत्ये करू शकत नाहीत . त्यांचा बंदोबस्त मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीच करू शकतात,” असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.