सातारा उदयनराजेंचाच बालेकिल्ला… राजेंचीच कॉलर टाइट! – changbhalanews
राजकियराज्य

सातारा उदयनराजेंचाच बालेकिल्ला… राजेंचीच कॉलर टाइट!

हाय व्होल्टेज लढतीत भाजपा महायुतीचे उदयनराजे भोसले विजयी तर मविआचे शशिकांत शिंदे पराभूत

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
देशात आणि राज्यात बहुचर्चित ठरलेल्या, इंडिया आघाडीचे नेते शरद पवार यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या 45 सातारा लोकसभा मतदारसंघाच्या हाय व्होल्टेज लढतीत भाजपा महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी चौदाव्या फेरीपर्यंतचे मताधिक्य फेडून निकालापर्यंत मताधिक्याची आघाडी कायम ठेवत 32771 मताधिक्क्याने महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना पराभूत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाल्याने तसेच उमेदवार शिंदे यांच्यासाठी शरद पवार यांनी तब्बल तीन सभा घेतल्याने ही लढत प्रतिष्ठेची बनली होती. मात्र मतदार संघातील राजांच्या सर्वच शिलेदारांनी विजय खेचून आणला.

मतमोजणीमध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंहराजे भोसले यांना विजयी घोषित करण्यात आल्यानंतर त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रमाणपत्र दिले. यावेळी निवडणूक निरीक्षक सुरेन धिरण व आर अर्जुन यांच्या सह अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे आदी उपस्थित होते.

या निवडणुकीत सुरुवातीला पोस्टल मतांमध्ये उदयनराजे भोसले आघाडीवर होते. मात्र तेराव्या फेरीपर्यंत शशिकांत शिंदे यांनी आघाडी कायम राखली होती. जवळपास 13000 हून अधिक असलेली मताधिक्याची आघाडी चौदाव्या फेरीपासून उदयनराजे भोसले यांनी मुसंडी मारत कमी करत नेली. पंधराव्या फेरीपासून शशिकांत शिंदे पिछाडीवर पडले आणि उदयनराजेंचे मताधिक्य वाढत गेले.

विधान सभा मतदार संघ निहाय अंतिम निकालात मिळालेल्या मतामध्ये वाई मतदार संघात उदयनराजे भोसले यांनी 90685, तर शशिकांत शिंदे यांनी 97428 मते घेत शिंदेंनी 6743 मतांची आघाडी घेतली. कोरेगाव मतदार संघात उदयनराजे यांनी 6855 इतके मताधिक्य घेतले. त्यांना 103922 तर शशिकांत शिंदे यांना 97067 मते मिळाली. शिंदे होम पिचवर मजबूत बॅटिंग करू शकले नाहीत.

ही निवडणूक दोन्ही कराड विधानसभा व पाटण विधानसभा मतदारसंघावर अवलंबून होती, कारण गत वेळी या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळालेली आघाडी कुठेच कमी होऊ शकली नव्हती. मात्र यावेळी उदयनराजे भोसले यांच्या टीमसह महायुतीच्या मातब्बरांनी, भाजपच्या सूक्ष्म नियोजनाने घेतलेल्या मेहनतीला यश आले. कराड उत्तर मतदार संघात तेराव्या फेरीपर्यंत उदयनराजे आघाडीवर होते. चौदाव्या फेरीपासून शिंदेनी अल्प आघाडी घेतली. अंतिम निकालात शशिकांत शिंदे यांना अवघे 1724 इतकेच मताधिक्य मिळाले. त्यांना 90654 तर उदयनराजे यांना 88930 इतकी मते मिळाली.

अतुल भोसलेनीं ‘शब्द’ खरा केला…

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात विंग येथील प्रचाराच्या शुभारंभ सभेतच विरोधक आम्हाला कितीही कमी समजत असले तरी कराड दक्षिण मधून उदयनराजे यांना काही झालं तरी आम्हीच लीड देऊ, असा शब्द भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी डॉक्टर अतुल भोसले यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिला होता. एकाकी झुंज देत, राजेंद्रसिंह यादव विक्रम पावसकर, माजी आमदार आनंदराव पाटील यांना सोबत घेत भोसलेनी एक दिलाने कराड दक्षिणचा किल्ला लढवत उदयनराजे यांना 616 मतांची आघाडी दिली. ही आघाडी वरवर कमी वाटत असली तरी विरोधकांना आघाडी मिळवून न देण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी ठरला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे ही आयोजन केले होते, त्याचाही उदयनराजेंना फायदाच झाला. कराड दक्षिण मध्ये उदयनराजेंना 92814 तर शशिकांत शिंदेंना 92198 मते मिळाली. पाटणला शरद पवार यांनी शिंदे यांच्यासाठी जोरदार प्रचार सभा घेतली होती. या सभेचा फायदा त्यांना मिळालाच, या पालकमंत्री शंभूराजे देसाई यांचा हा मतदारसंघ असतानाही मतदारसंघात शिंदे यांना 2943 मताधिक्य मिळाले. त्यांना 78403 तर उदयनराजे यांना 75460 मते मिळाली.

बाबाराजे ठरले विजयाचे शिल्पकार…

या निवडणुकीत साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रभावी कामगिरी केली तर ते उदयनराजे यांना विजयश्री मिळवून देतील, अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत होते. ती तंतोतंत खरी ठरली. सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातून सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये शशिकांत शिंदे आघाडीवर होते. मात्र तेराव्या फेरीपासून उदयनराजे यांना मताधिक्य वाढत गेले ते शेवटपर्यंत कायम राहिले. उदयनराजे यांना 36233 इतके मताधिक्य मिळाले. त्यांना 116938 तर प्रतिस्पर्धी शशिकांत शिंदे यांना 80705 इतकी मते मिळाली. सातारा , कराड दक्षिण आणि कोरेगावने उदयनराजेंच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यात मोठी भूमिका बजावली. पोस्टल मतदानामध्ये उदयनराजे यांनी 2385 मते तर शशिकांत शिंदे यांनी 1888 मते घेतली.

अंतिम निकालात उमेदवार निहाय मिळालेल्या मतांची एकूण संख्या पुढीलप्रमाणे : श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले – 5 लाख 71 हजार 134, शशिकांत जयवंतराव शिंदे – 5 लाख 38 हजार 363, आनंद रमेश थोरवडे – 6 हजार 485, प्रशांत रघुनाथ कदम – 11 हजार 912, तुषार विजय मोतलिंग – 1 हजार 301, सयाजी गणपत वाघमारे – 2 हजार 501, डॉ. अभिजित वामनराव आवाडे बिचुकले – 1 हजार 395, सुरेशराव दिनकर कोरडे – 4 हजार 712, संजय कोंडिबा गाडे -37 हजार 62, निवृत्ती केरू शिंदे – 2 हजार 674, प्रतिभा शेलार – 1 हजार 123, सदाशिव साहेबराव बागल – 958, मारुती धोंडीराम जानकर – 3 हजार 951, विश्वजित पाटील – उंडाळकर – 3 हजार 438, सचिन सुभाष महाजन – 2 हजार 15, सीमा सुनिल पोतदार – 3 हजार 458, नोटा – 5 हजार 522 या प्रमाणे मते मिळाली आहेत. तसेच अवैध मतांची संख्या एकूण 2 हजार 180 आहे. प्रदत्त मते – 25 आहेत.

मतमोजणीची प्रक्रिया संपूर्ण यंत्रणेने सुरळीतपणे पार पाडल्याबद्दल जि्ल्हा निवडणूक अधिकारी श्री. डुडी यांनी संपूर्ण यंत्रणेचे आभार मानले. यावेळी त्यांनी कायदा व सुव्यवस्थेबद्दल पोलीस यंत्रणेचेही आभार मानले.

मताधिक्य मोठं अपेक्षित होतं….

उदयनराजे यांनी निवडून आल्यानंतर पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. “सातारच्या जनतेने ज्या पद्धतीने मला निवडून दिलं त्याबद्दल मी पूर्णपणे असमाधानी आहे. लोक केवळ पैसे घेतात आणि मत देतात, पैसे जर घेणार असतील तर त्याला काय अर्थ आहे. माझं मताधिक्य हे मला मोठ्या प्रमाणावर अपेक्षित होतं. याबाबतीत सविस्तर एक दोन दिवसात मी पत्रकारांशी बोलेन, असं उदयनराजे म्हणाले आहेत.

भाजपाचा खासदार कधीच निवडून येणार नाही म्हणणाऱ्यांना चपराक…

सातारा लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा झालेला विजय, हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारांचा विजय आहे. सातारा लोकसभेतील उदयनराजेंच्या विजयामुळे सातारा जिल्ह्यातील जनतेने नरेंद्र मोदींना देशात पुन्हा सत्तेवर बसविण्यासाठी पाऊल उचलले आहे. तसेच साताऱ्यात कधीच भाजपचा खासदार निवडून येणार नाही, असे म्हणणाऱ्या प्रवृत्तींना, जिल्ह्यातील समस्त जनतेने या निकालाने सणसणीत चपराक दिली आहे.
-डॉ. अतुलबाबा भोसले
सातारा लोकसभा प्रभारी, भाजपा

हा यशवंत विचारांचा उमेदवार नव्हता… निवड चुकली होती!

आदरणीय शरद पवार साहेबांची उमेदवाराची निवड चुकलेली आहे हे मी अगोदरपासूनच सांगत होतो. यशवंत विचाराचा हा उमेदवार नव्हताच. 4000 कोटीचा घोटाळा केलेला, सामान्य शेतकऱ्याचे आयुष्य उध्वस्त केलेला हा उमेदवार होता. त्यांना जनतेने त्याची जागा दाखवली आहे. कोरेगाव मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ज्या पाणी योजना झाल्या, त्याचाच हा विजय आहे.
= महेश शिंदे, आमदार, कोरेगाव विधानसभा.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close