धोंडेवाडीच्या सुपुत्राचा पुण्यात गौरव

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल कराड तालुक्यातील धोंडेवाडी गावचे सुपुत्र प्रवीण काकडे यांना पुणे येथे महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
प्रवीण काकडे हे ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. तसेच ते कराड तालुक्यातील धोंडेवाडी गावचे सुपुत्र आहेत. त्यांनी अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात 4493 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे. नोकरी करत असताना मिळालेल्या सुट्टीचा सदुपयोग करून त्यांनी समाज जागृत करण्याचे काम सुरू ठेवले आहे. अनेक विद्यार्थ्यांची शाळेची फी भरण्यासाठी सहकार्य केले आहे. दुर्गम डोंगरदऱ्यातील वाड्यावस्त्यांवर पोहचून त्यांनी शैक्षणिक व सामाजिक प्रबोधन करत सहकार्याचा हात उपेक्षितांना दिला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना सिनेअर्क प्रोडक्शन मुंबईचेवतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक हॉल पुणे येथे राष्ट्रपती पदक विजेते पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त युसुफ पठाण, सिने अर्क प्रोडक्शनचे चेअरमन विनोद जी खैरे , अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक व ज्येष्ठ इतिहास संशोधक जयदेव जाधव यांचे शुभ हस्ते महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रवीण काकडे यांनी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे या सारख्या जिल्ह्यातील डोंगरदऱ्या खोऱ्यातील गोरगरीब समाज बांधव , जंगल भागातील गोरगरीब वंचित घटकातील मुलांना अनमोल असे सहकार्य करून समाजात एक चांगला आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन उपायुक्त युसुफ पठाण यांनी यावेळी बोलताना केले.
दरम्यान, महाराष्ट्रात रत्न पुरस्काराने सन्मान झाल्याने प्रवीण काकडे यांचे धोंडेवाडी ग्रामस्थांसह सातारा जिल्ह्यातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.