सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांना ऊसाला चांगला दर देण्याशिवाय पर्याय नाही, त्यांनी भूमिका स्पष्ट करावी
स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांचे आवाहन
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले, त्यांची दखल घेऊन मागील हंगामातील ऊस बिल १०० ते ५० रुपये शेतकऱ्यांना दिले. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री, पालकमंत्री कोल्हापूर व जिल्हाधिकारी यांनी मिळून हा तोडगा काढला. तोच तोडगा सातारासाठी सुध्दा लागू करण्यात यावा व याबाबत कारखानदारांनी स्पष्ट भूमिका मांडावी, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
शेळके यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यातील काही साखर कारखाने भाडे तत्त्वावर देण्यात आले आहेत. त्यांना मुळ संस्थेला भाडे द्यावे लागते. तरीही ते ३१५१ पहिली उचल देतात, मग ज्यांना भाडे द्यावे लागत नाही, त्यांचा दर सुध्दा मागील हंगामात व यंदा जवळपास एकच कसा?.
सातारा जिल्ह्यातील फलटण, खटाव, खंडाळा हे आजपर्यंत कमी रिकव्हिरी झोन म्हणून जिल्ह्यात या अगोदर कमी दर देत होते. ते कारखाने ३०५१ ते ३१५१ पहिली उचल जाहीर करतात म्हणजे नेहमीपेक्षा जवळपास २५० ते ३५० रुपये जास्त, मग जास्त रिकव्हिरी असणारे कारखाने दरात मागे कसे?
सातारा जिल्ह्यातील ज्या कारखान्यांचे उपपदार्थ निर्मिती केली जात नाही, ते कारखाने उपपदार्थ घेणार्या कारखान्यांच्या बरोबरीने दर देतात व पहिली उचल सुध्दा देतात मग इतर उत्पादने घेणारे कारखाने जास्त दर का देऊ शकत नाहीत?
मागील गळीत हंगामात महाराष्ट्रातील जवळपास सात ते आठ साखर कारखानदारांनी एफ आर पी पेक्षा ३५० ते ५०० रुपये जास्त दिले मग अनेक वर्षे या उद्योगात असणार्या कारखान्यांना हे का जमले नाही?
सातारा जिल्ह्यातील जावली,वाई, खंडाळा या भागातील असणारे साखर कारखाने शेतकऱ्यांसाठी आम्ही फार मोठे काहीतरी करत असल्याचा आव आणून लुटालूट चालविली आहे. तिथला ऊस स्थानिक कारखान्यांना घातला तर २८०० रुपये टनाला व जरा लगत असलेल्या अजिंक्यतारा, शरयु , जरंडेश्वर या कारखान्याला ऊस घातला तर ३१०० ते ३१५१ रुपये मिळतात तर राजकारणासाठी खोटा कळवळा आणणारे स्थानिक शेतकऱ्यांचे पहिल्या उचलीलाच टनाला ३०० ते ३५० रुपये नुकसान करतात. अजून पुढे जाऊन किती करणार व आता किसनवीर कारखाना यांनी २०० रुपये टनाला वाढ देऊन हे शेतकऱ्यांना दर देणे शक्य असताना का देत नव्हते व १००० कोटीच्या घोटाळ्याचे पुरावे जनतेला दाखवून सत्ता घेणारे आता हा दुसरा हंगाम चालू झाला तरीही कोणतीच कारवाई का करत नाहीत व शेतकऱ्यांचे अजून थकीत ऊस बिल करोडो रुपये कधी देणार?
सातारा जिल्ह्यात नव्याने सुरू होणारे कारखाने यांना अडथळा निर्माण करुन यांना सुध्दा शेतकऱ्यांना ज्यादा दर देण्याची इच्छा असताना देऊन देत नाहीत व आमच्या कार्यक्षेत्रातील ऊस गाळप करायचा नाही अशी नोटीस पाठवल्या. त्यापेक्षा आपला आजपर्यंतच्या या उद्योगातील अनुभव पणाला लावून जास्त दर जाहीर करुन दराची स्पर्धा करुन ऊस घेऊन जावा. नवीन सुरू होणारे कारखाने यांना स्पर्धा करता येते तर तुम्ही येवढं जूने अनुभवी तुम्हाला का जमत नाही याचे शेतकऱ्यांना उत्तर द्या.
खटाव तालुक्यातील वर्धन अग्रो हा कारखाना शेतकऱ्यांनी स्वत: ऊस पोहोच केला तर ४१११ रुपये टनाला दर देण्याचे जाहीर करतो. मग सातारा जिल्ह्यातील इतर सर्व साखर कारखान्यांची दरातून तोडणी वाहतुक वजा केली तर सरासरी ८०० रुपये वजा करावे लागतील. मग ४१११ मधून ८०० रुपये वजा केले तर ३३११ रुपये शिल्लक राहतात. सातारा जिल्ह्यातील इतर साखर कारखानदार शेतकऱ्यांना कसे फसवतात हे याच कारखान्यांने सिध्द केले आहे, असे राजू शेळके यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
शेतकऱ्यांनो आता कुठं स्पर्धा सुरू झालीय..!
सातारा जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जाहीर आवाहन करतो की दर पाहिजे असेल तर थोडे थांबा. ऊस घालवण्याची घाई करू नका. आता कुठे स्पर्धा चालू झाली आहे , अजून चांगला दर मिळू शकतो , आमचा प्रयत्न चालू आहेच. फक्त तुमची साथ हवी.
– राजू शेळके, जिल्हाध्यक्ष,
स्वाभिमानी शेतकरी संघटना, सातारा.