सौरभ पाटील समाजभूषण तर जीवन पवार विद्याभूषण पुरस्काराने सन्मानित – changbhalanews
शैक्षणिक

सौरभ पाटील समाजभूषण तर जीवन पवार विद्याभूषण पुरस्काराने सन्मानित

टिळक हायस्कूलच्या माजी विद्यार्थी सेवा संघाचे पुरस्कार वितरण

चांगभलं ऑनलाइन | हैबत आडके
टिळक हायस्कूल माजी विद्यार्थी सांस्कृतिक सेवा संघाचा माजी विद्यार्थी मेळावा व गुणवान माजी विद्यार्थी पुरस्कार प्रदान समारंभ शनिवारी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी कराडचे माजी नगरसेवक सौरभ पाटील यांना टिळक हायस्कूल समाजभूषण तर विद्यानगरमधील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक जीवन पवार यांना विद्याभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अध्यक्षस्थानी सातारा येथील श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी होते. शिक्षण मंडळाचे सेक्रेटरी चंद्रशेखर देशपांडे, चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, टिळक हायस्कूल माजी विद्यार्थी सांस्कृतिक सेवा संघाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद पेंढारकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

स्व.शे.रा.कि. लाहोटी कन्या प्रशालेत झालेल्या या कार्यक्रमात सुरुवातीला व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते स्व. लोकमान्य टिळक व स्व. यशवंतराव चव्हाण यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले.

यावेळी टिळक हायस्कूल भूषण पुरस्कार कोल्हापूर येथील सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक ज्ञानेश्वर उद्धव भिसे, टिळक हायस्कूल उद्योगभूषण पुरस्कार पुणे येथील उद्योजक विलास रामचंद्र घळसासी, टिळक हायस्कूल विद्याभूषण पुरस्कार विद्यानगर येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक जीवन मोहनराव पवार, टिळक हायस्कूल धन्वंतरी पुरस्कार डॉ. विश्वास स्वानंद धायगुडे, टिळक हायस्कूल समाजभूषण पुरस्कार
माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते सौरभ अशोकराव पाटील, टिळक हायस्कूल क्रीडा भूषण पुरस्कार लिबर्टी मजदूर मंडळाचे संचालक काशिनाथ भाऊ चौगुले यांना तर आदर्श गुणवत्ता शिक्षक पुरस्कार टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपशिक्षक राजेश नारायण धुळूगडे , आदर्श गुणवत्ता सेवक पुरस्कार शिक्षण मंडळाची इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे लिपिक गणेश शहाजी मोरे यांना प्रदान करण्यात आला.

यावेळी बोलताना अमित कुलकर्णी म्हणाले, शिक्षण मंडळ व टिळक हायस्कूलने या राज्याला आणि देशाला उपपंतप्रधान , राज्यपाल, तसेच अनेक आमदार, खासदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, अनेक प्रशासकीय अधिकारी, उद्योजक आणि आदर्श नागरिक घडविले आहेत. त्यामुळे संस्थेचे देशभरात नाव आहे. चंद्रशेखर देशपांडे यांनी संस्थेमार्फत सुरू असलेल्या विविध विभागांची माहिती देवून पुरस्कार प्राप्त झालेल्या पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले.

सत्कारास उत्तर देताना सौरभ पाटील म्हणाले, एखादं बक्षीस मिळवल्यानंतर आई जसं मुलाचं जवळ घेऊन कौतुक करते, पाठीवरून कौतुकाचे हात फिरवते, तशीच माझ्या शाळा माऊलीने हा पुरस्कार देऊन मला कौतुकरुपी शाबासकी दिली असल्याचे त्यांनी सांगितले. शाळेचे संस्कार आपण आयुष्यभर जपत आलो ,त्यातून देशासाठी काम करणारे अनेक प्रशासकीय अधिकारी घडवता आले, असे जीवन पवार यांनी यावेळी बोलताना आवर्जून सांगितले. अन्य पुरस्कारर्थींनीही मनोगत व्यक्त केले. संगीता काणे व मुकुंद किर्लोस्कर यांनी स्वागतगीत गायले. उपशिक्षक जीवन थोरात यांनी सूत्रसंचालन केले. आभार मुख्याध्यापक जी.जी. अहिरे यांनी मानले.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close