चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
अलीकडच्या काळात महाराष्ट्रात वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, पण त्या अधिकाराचा वापर आपण कशाप्रकारे करायचा हा प्रत्येकाचा स्वतः चा अधिकार आहे. आज समाजात वेगवेगळे प्रश्न आहेत, पण रोज कोणीतरी काहीतरी विधान करत आहेत. कोणी आरे म्हटलं तर लगेच दुसरा का रे म्हणतो. ही शिकवण यशवंतराव चव्हाण यांनी दिलेली नाही, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे सगळयांनी लक्षात ठेवावं, असं उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी कोणाचेही नाव न घेता राज्यातील वाचाळवीरांना सुनावलं. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त शनिवारी कराड येथील प्रतिसंगमावर समाधीस्थळी स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
ना. अजितदादा पवार हे वाचाळविरांच्याबद्दल स्पष्टीकरण देताना म्हणाले की, मी कोणत्या पक्षाचा उल्लेख केलेला नाही, मी दोन्ही बाजू म्हटल्यानंतर सगळेच त्यात आले, त्यात आम्ही लोक देखील आलो. कोणा एकाला बोलायची गरज नाही, तर माझ्यासह सर्वांनाच आज आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
त्यामुळे त्यांना राज्यकर्ते खेळवत आहेत असं वाटतंय…
प्रत्येकाला आपल्या समाजासाठी आरक्षण मागण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल कोणाचेच दुमत नाही. पण आरक्षण देताना ते कायद्याच्या चौकटीत टिकलं पाहिजे, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आम्ही आरक्षण दिलं होतं, पण दुर्दैवाने ते हायकोर्टात टिकले नाही. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आरक्षण हायकोर्टात टिकलं पण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही, त्यामुळे त्या घटकाला राज्यकर्ते समाजाला खेळवत आहेत का अस वाटतंय, असं उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी सांगितलं.
भूमिका मांडताना कटुता येऊ देऊ नका….
प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे पण ती मांडताना त्यातून कटुता येवू नये, एकमेकांबद्दल कटुता निर्माण होऊ नये, याबद्दलची काळजी सर्वांनीच घ्यावी, असा सल्ला ना. पवार यांनी सध्याच्या राज्यातील परिस्थितीवर भाष्य करताना दिला. प्रत्येकाची नाव घेऊन कोट करून मी बोलत नाही. पण सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष या सर्वांनीच भूमिका नीटपणे समजून घेऊन कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं.
सामाजिक एकोपा कसा ठेवायचा याची मुहूर्तमेढ यशवंतरावांनी रोवली….
ना. पवार म्हणाले, सुसंकृत महाराष्ट्रात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये व्यवस्थित एकोपा करून एकमेकांचा आदर करून समाजकारण आणि राजकारण कसं करायचं असतं याची मुहूर्तमेढ स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी रोवली आहे.
बिहारसारखा निर्णय घेता येईल का याबाबत सध्या चर्चा सुरू आहे…
बिहार सरकारने काही वेगळे निर्णय घेतले आहेत, आता आमचं अधिवेशन येत आहे. या अधिवेशनामध्ये तसं काही करता येईल का याबाबत आमच्यामध्ये सध्या चर्चा सुरू असल्याचं ना. पवार यांनी सांगितलं.
ज्यांच्या चुका असतील त्यांच्यावर कारवाई होईल…
अंतरवाली सराटी या ठिकाणी झालेल्या दगडफेकीत सापडलेले संशयित आरोपी यांच्याकडे गावाठी कट्टा सापडला आहे. यासंदर्भात अजित पवार यांनी सांगितलं की पोलिस कोणाच्याही दबावाला बळी न पडता सखोल तपास करतील. त्यातून वस्तूस्थिती समोर येईल. ज्यांच्या चुका असतील त्यांच्यावर कडक कारवाई होईल.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादन…
राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रीतिसंगम, कराड येथील समाधी स्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी पर्णकुटी या समाधी स्थळावरील आयोजित भजन कार्यक्रमास उपस्थिती लावली.