महाडच्या फार्मा कंपनी स्फोटात कराड तालुक्यातील युवक बेपत्ता
शोधासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू : ग्रामस्थ महाडकडे रवाना
चांगभलं ऑनलाइन | कराड
कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीत ब्ल्यू जेट हेल्थकेअर लिमिटेड या फार्मा कंपनीत शुक्रवारी ३ नोव्हेंबर रोजी सकाळी लागोपाठ स्फोट होऊन आग लागल्याने बेपत्ता झालेल्या ११ जणांमध्ये कराड तालुक्यातील युवकाचा समावेश आहे. अस्लम मेहबूब शेख (वय २७) असे त्याचे नाव आहे. अस्लम हा कराड तालुक्यातील बेलवडे बुद्रुक गावचा रहिवासी आहे.
दरम्यान, बेपत्ता युवकांची शोधमोहीम युद्ध पातळीवर सुरू आहे. महाड एमआयडीसीतील या मोठ्या दुर्घटनेत गावचा युवक बेपत्ता झाल्याची माहिती समजताच बेलवडे बुद्रुक येथील नातेवाईक व ग्रामस्थ महाडकडे रवाना झाले आहेत.
महाड येथील या दुर्घटनेत ब्ल्यू जेट हेल्थकेअर लिमिटेड या फार्मा कंपनीत काम करणारे जीवन कुमार चोबे, अभिमन्यू उरॉव, विकास महाती, शेखराव भुसारे, अक्षय सुतार राहणार तळीये, सोमीनाथ विधाते, विशाल कोळी, संज्ञेय पवार, अस्लम शेख, सतिष साळुंखे, आदित्य मोरे असे ११ जण अद्याप बेपत्ता आहेत. या घटनेत आठ व्यक्ती जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींमध्ये स्वप्नील भामरे, विक्रम उरे, भिमाची मुर्मु, राहुल गिरमी धुळे, मयुर निंबाळकर, जळगाव, उत्तम विश्वास, ज्योतू तोबा पुरम या कामगारांचा समावेश आहे. तर बेपत्ता युवकांमधील अस्लम मेहबूब शेख वय २७, हा कराड तालुक्यातील बेलवडे बुद्रुक गावचा युवक आहे.
अस्लम शेख याने बीएससी चे शिक्षण घेतल्यानंतर तो सुरूवातीला लोटा येथे व त्यानंतर औरंगाबाद येथे नोकरीस होता. गेल्या ९ महिन्यापूर्वी तो महाड एमआयडीसीत ब्ल्यू जेट हेल्थकेअर लिमिटेड या फार्मा कंपनीत नोकरीस लागला आहे. त्याचे वडील मेहबूब शेख हे ट्रक चालक आहेत. आई गृहिणी आहे. भाऊ सलीम शेख हा शिक्षण घेत आहे. अस्लम आणि सलीम दोघे बंधू आवळे-जावळे आहेत. त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे.
महाड एमआयडीसीतील दुर्घटनेत अस्लम शेख बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच त्याचे नातेवाईक व गावातील ग्रामस्थ आणि मित्रपरिवार असे सर्वजण महाडकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, महाड येथील घटनास्थळी महाड पोलीस, प्रांताधिकारी, तहसीलदार, रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश पाटील म्हसे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे आदी प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी ठाण मांडून आहेत. बेपत्ता झालेल्या युवकांच्या शोधासाठी प्रशासनाचे व कंपनी व्यवस्थापनाचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.