कराडला सोमवारी आजी-माजी सैनिक कुटुंबियांचा मेळावा
तहसील कार्यालयात होणार सैनिक कक्ष स्थापन

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड तालुक्यातील भारतीय सेनेतील व प्यारा मिल्ट्री फोर्स मधील सर्व आजी-माजी सैनिक , त्यांचे कुटुंबीय, शहीद जवान कुटुंबीय यांचा सोमवार दि. २० नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता “अमृत वीर जवान अभियान अंतर्गत” येथील तहसील कार्यालयात मेळावा होणार आहे.
या मेळाव्यात सैनिकांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात येणार आहे. कराड तालुक्याचे उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे व तहसीलदार विजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार कार्यालयातील बैठक हॉल येथे हा मेळावा होणार आहे. यावेळी तहसीलदार कार्यालय येथे “सैनिक कक्ष” स्थापन करण्यात येणार आहे.
या सैनिक मेळाव्यासाठी तालुक्यातील पोलीस विभाग, भूमि अभिलेख विभाग, पंचायत समिती विभाग, नगरपरिषद विभाग, वन विभाग, महावितरण विभाग, सहकार विभाग, कृषी विभाग व इतर सर्व प्रशासकीय विभागातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तरि सर्व कराड तालुक्यातील सेवारत सैनिक, माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय व शहीद जवानांचे कुटुंबीय यांनी आपले तक्रारअर्ज बरोबर घेऊन येणे. या मेळाव्यासाठी बहुसंख्येने सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सातारा जिल्हा सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष व अमृत वीर जवान अभियान माजी सैनिक संघटनेचे कराड तालुका प्रतिनिधी, तथा माजी सैनिक प्रशांत कदम यांनी केली आहे.