कोरोनासारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, नव्या विषाणूचा वेळीच धोका ओळखून उपायोजना राबवा ; काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची सरकारकडे मागणी

चांगभलं ऑनलाइन | कराड – हैबत आडके
कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर हजारो लोकांना प्राणास मुकावे लागले होते, लॉकडाऊन झाल्यानंतर हजारो कंपन्या बंद पडल्या, लाखो लोकांना रोजगार गमवावा लागला, आता पुन्हा ती परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी राज्य सरकारने आपल्या पातळीवर तातडीने उपाययोजना कराव्यात, नव्याने जगभरात थैमान घालणाऱ्या विषाणूचा संसर्ग आपल्याकडे रोखला जावा, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा धोका सांगत काँग्रेस नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून यासंदर्भात तातडीने पावले उचलण्याची मागणी केली आहे.
आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी एक्सवरूनही मुख्यमंत्र्यांना त्यांचे मागणी पत्र पाठवले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की,
एमपाॅक्स (मंकीपॉक्स) विषाणू जगभरात पसरत आहे. तो आपल्या शेजारी पोहोचला आहे. हाय रिस्क देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी मुंबई विमानतळावर कठोर चाचणी आणि विलगीकरण प्रोटोकॉल लागू करणे गरजेचे आहे.
Mpox (मंकीपॉक्स) विषाणू संसर्गाच्या येऊ घातलेल्या धोक्याबद्दल तुमचे लक्ष वेधण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे. कोविड-19 विषाणूशी लढताना आपल्या देशाला अलीकडेच एका महत्त्वपूर्ण आव्हानाचा सामना करावा लागला आहे .लाखो कोविड योद्ध्यांच्या अथक आणि निस्वार्थ प्रयत्नांमुळे आम्ही त्या संकटावर मोठ्या प्रयत्नाने मात केली.
जागतिक आरोग्य संघटनेने अलीकडेच Mpox (मंकीपॉक्स) ला “सार्वजनिक आरोग्य आणीबाणी” म्हणून घोषित केले आहे. आफ्रिकेत उगम झालेला हा विषाणू आता वेगाने जगभरात पसरत असून आता तो पाकिस्तानात पोहोचला आहे. आपल्या देशात त्याचा प्रवेश आणि प्रसार रोखण्यासाठी सरकारने सक्रिय पावले उचलावीत.
त्याचाच एक भाग म्हणून मुंबई विमानतळावर तात्काळ चाचणी आणि क्वारंटाईन सुविधा लागू कराव्यात, अशा संसर्ग असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी हे तातडीने करणे गरजेचे आहे. जे कोविड-19 दरम्यान योग्यरित्या केले गेले नाही. संक्रमित व्यक्तीला कोणत्याही तपासणी, उपचार न करता देशात आणि राज्यात प्रवेश दिला गेल्यास किंवा या संदर्भातील उपाययोजना करण्यास विलंब झाल्यास जनतेला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतील, त्यामुळे सरकारने वेळीच उपाययोजना करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.
https://x.com/prithvrj/status/1824836009420325014?t=aI65A3D175bdsbCoEKebgw&s=19