श्री राम नामाच्या गजराने दुमदुमले अवघे रेठरे बुद्रुक
मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त श्री राम मंदिरात महाआरती; प्रसाद वाटप
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
तीर्थक्षेत्र अयोध्या येथील श्री राम मंदिर मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील श्री राम मंदिरात आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांना भाविकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. उत्तरा भोसले यांच्या शुभ हस्ते रेठरे बुद्रुक येथील श्री राम मंदिरात महाआरती करण्यात आली. तसेच भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी भाविकांतून झालेल्या श्री राम नामाच्या गजराने अवघे रेठरे बुद्रुक गाव दुमदुमून गेले. याप्रसंगी आयोजित भजन कार्यक्रमालाही भाविकांचा चांगला प्रतिसाद लाभला. यावेळी या मंदिराचे पुजारी गणेश रेठरेकर व सौ. अंजली रेठरेकर या दाम्पत्याचा डॉ. भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्यानंतर सौ. ताराबाई मोहिते विद्यालयात अयोध्या येथील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. डॉ. सुरेश भोसले व सौ. उत्तरा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या थेट प्रक्षेपण कार्यक्रमालाही ग्रामस्थांनी मोठी उपस्थिती लावत, श्री राम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचा आनंदानुभव घेतला.
अयोध्येत श्री राम मंदिराचे होत असलेले लोकार्पण ही ऐतिहासिक गोष्ट असून, हा मंगलमय सोहळा आपल्यालाही थेट प्रसारणाच्या माध्यमातून अनुभवता आला, ही चांगली गोष्ट आहे. आता लवकरच रेठरे बुद्रुक येथील श्री राम मंदिरांचे पुन:निर्माणाचे काम लोकांच्या सहभागातून हाती घेण्याची घोषणा डॉ. भोसले यांनी यावेळी केली. ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात या घोषणेचे स्वागत केले.
कार्यक्रमाला सरपंच हणमंत सूर्यवंशी, उपसरपंच सौ. भाग्यश्री पवार यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.