चांगभलं ऑनलाइन | हैबत आडके
राज्य सरकारच्या वतीने सातारा जिल्ह्यातील काही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले आहेत. मला आश्चर्य हे वाटते की वाई, खंडाळा या सारख्या तालुक्यांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. मला त्याच्यावर आक्षेप नाही परंतु करण्यात आलेल्या सर्व्हे कशाच्या आधारे आणि कोणत्या निकषांच्या माध्यमातून करण्यात आला. तसं असेल तर सर्व्हे चुकीचा झाला आहे. सर्व्हे करताना ज्यांची चूक झाली अश्या लोकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे.
आ. शिंदे म्हणाले, पावसाने अनेक दिवसांपासून दडी दिली असून शेतकरी अडचणीत आहे. माण, खटाव, कोरेगाव हा भाग दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाला पाहिजे. ज्या ठिकाणी पाऊस नाही, अशा भागाचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये झाला पाहिजे. संपूर्ण सातारा जिल्हा दुष्काळग्रस्त असून संपूर्ण जिल्हा या निकषात बसवण्यात यावा.
वरील तालुक्यांचा का समावेश झाला नाही, याचा प्रशासनाने खुलासा करावा. जर त्रुटी ठेवल्या असतील तर संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी. त्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असेल तर दुर्दैवी आहे. वरील तालुके निकषात का बसत नाही ? याचा जिल्हाधिकारी आणि प्रशासनाने खुलासा करावा, अशी मागणीही आ. शशिकांत शिंदे यांनी केली आहे.