कराड शहरातील चौकाचौकांचे विद्रूपीकरण केंव्हा थांबणार…!
साताऱ्यात नागरिकांचे पाऊल, कराडला नागरिकांच्या भूमिकेकडे लक्ष
चांगभलं ऑनलाइन | हैबत आडके
वाहतुकीचा, शहरातल्या ऐतिहासिक वास्तूंचा, महापुरुषांच्या पुतळ्यांचा, धोकादायक ठिकाणांचा अशा कशाचाही विचार न करता सर्रासपणे शहरातील चौकाचौकात फ्लेक्स बोर्ड उभा करण्याचे फॅड सध्या सर्वत्र सुरू आहे. त्यामुळे शहराच्या विद्रूपीकरणात भर पडते आणि वाहतुकीला मोठे अडथळे निर्माण होतात, पोलीस आणि पालिका प्रशासनही डोळे झाकून त्याकडे दुर्लक्ष करतात. हे चित्र साताऱ्याप्रमाणे कराड शहरातही सर्वत्र पाहायला मिळत आहे. याबाबत सातारा शहरात अखेर संवेदनशील नागरिकांनीच पुढे येऊन चौकात श्वानांच्या वाढदिवसाचे फ्लेक्स बॅनर उभा केले आहेत. फ्लेक्सबाजांनी यामधून धडा घ्यावा, अशी नागरिकांची भूमिका आहे. दरम्यान, साताऱ्यात नागरिकांनीच हे पाऊल उचलल्याने कराड शहरात संवेदनशील नागरिक आगामी काळात काय भूमिका घेतात, याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.
शहरातील ऐतिहासिक चौक, वास्तू, महापुरुषांचे पुतळे याचे सौंदर्य जपणे महत्त्वाचे असते. अनेक ठिकाणी चौकात वाहतुकीचे दिशादर्शक फलक असतात. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून अनेक जण वाढदिवस व इतर कार्यक्रमांचे मोठंमोठे फ्लेक्स उभे करून शहराचे विद्रूपीकरण करत असतात. गजबजलेल्या चौकात वस्तुतः पालिकेने एका फ्लेक्सला परवानगी दिलेली असते , मात्र प्रत्यक्षात वेगवेगळ्या प्रकारचे दहा ते पंधरा फ्लेक्स उभा राहिलेले दिसतात. या फ्लेक्सबाजांकडून कायद्याची पायमल्ली होतेच, पण पोलीस प्रशासनाला खिशात ठेवले आहे की काय असा प्रश्न संवेदनशील नागरिकांना पडल्या वाचून राहत नाही. शहरात फ्लेक्स उभा करताना, अनेकजण पालिकेकडून परवाना घेतल्याचा आव आणतात. पण परवाना घेतात एका फ्लेक्सचा अन् प्रत्यक्षात शहरभर पंधरा ते वीस ठिकाणी फ्लेक्स बिनदिक्कतपणे उभा केले जातात. त्यावर कोणीही कारवाई करताना दिसत नाही. कराडमध्ये गेल्या काही महिन्यात अशा कारवायाच झालेल्या नाहीत. त्यामुळे दर चार दिवसाला फ्लेक्सची संख्या वाढत असल्याचेच पाहायला मिळते.
एखाद्या कुटुंबात दुःखद प्रसंग घडतो, त्यावेळी त्याची माहिती देण्यासाठी किंवा श्रद्धांजली वाहण्यासाठी उभारलेला एखादा फ्लेक्स वेगळा पण गल्लीबोळातले कार्यकर्तेही वाढदिवस साजरा करण्यासाठी शहरभर बेकायदेशीरपणे फ्लेक्स उभा करत असतात. या फ्लेक्सकडे बघताना अनेकदा वाहन चालकांचे लक्ष जाते , त्यातून अपघात घडतात. अनेक फ्लेक्स वाहतुकीला थेट अडथळा निर्माण करतात. फ्लेक्समुळे शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे सौंदर्य झाकोळले जाते. महापुरुषांचे पुतळे दिसेनासे होतात. मात्र अशा फ्लेक्सवर कारवाई झाली तर नवल. कारवाईचे अधिकार असणारे अधिकारी त्याकडे ‘मूग’ गिळून गप्प बघत असतात. त्यामुळे फ्लेक्सबाजांचे मनोबल वाढत राहते, फ्लेक्सची संख्या वाढत राहते, शहरातील चौकाचौकांचे विद्रुपीकरण होत राहते आणि संवेदनशील नागरिकांना हे सर्व मूकपणे पहावे लागते.
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या सातारा शहरात मात्र संवेदनशील आणि जागृत नागरिकांनी या विरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांनी ‘डाॅन’ नावाच्या श्वानाला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देणारा फलक उभारला आहे. या फलकावर शुभेच्छुक आहेत शेरू, मोती, भाल्या, वाघ्या, गुंड्या आणि बरेच जण! सदानकदा चौकात फ्लेक्स उभा करून शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्या फ्लेक्सबाजांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं जावं, कारवाईचे अधिकार असणाऱ्यांनाही आपल्या अधिकारांची जाणीव व्हावी, हा सुज्ञ नागरिकांचा यामागील हेतू आहे. ज्या कुणी नागरिकांनी हे पाऊल उचलले आहे हे स्तुत्य पाऊल आहे, नक्कीच हे कौतुकास्पद आहे.
साताऱ्याप्रमाणे कराड शहरातील संवेदनशील सुज्ञ, नागरिक असे पाऊल उचलणार का हे महत्वाचे आहे. कारण बेकायदेशीर फ्लेक्सवर कारवायाच होताना दिसत नाहीत, कुठे दिखावा झाला तर तो चार दिवसांचाच असतो, दीर्घकाळ त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे फ्लेक्सबाजी नियंत्रणासाठी शहरातील सामाजिक संघटना, सूज्ञ नागरीक, पर्यावरणवादी कार्यकर्ते, वाहतूक संस्था, इतिहासप्रेमी नागरीक, कार्यकर्ते यांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. जागृती बरोबरच बेकायदेशीर फ्लेक्सवर कारवाई करण्यासाठी पालिका आणि पोलीस प्रशासनावरचा दबाव वाढवला पाहिजे. नाहीतर एका-एका चौकात भविष्यकाळात किती फ्लेक्स उभा लागतील, त्यातून काय काय राडे घडतील, हे सांगता येणार नाही.