कराड मधील या नामांकित शैक्षणिक संकुलात झाला हितचिंतक, गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
जनकल्याण प्रतिष्ठानचे शैक्षणिक कामकाज उच्च दर्जाचे, विद्यार्थांनी उच्च ध्येय ठेवून शिक्षण घ्यावे, त्यासाठी शिक्षक व ज्ञानदान करणाऱ्या संस्थांनी सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून विद्यार्थांच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे , असे प्रतिपादन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.
जनकल्याण प्रतिष्ठान व सरस्वती शैक्षणिक संकुल यांच्यावतीने संस्थेचे हितचिंतक, गुणवंत विद्यार्थी व शिक्षक यांच्या सन्मान सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. खा. श्रीनिवास पाटील, शिरीष गोडबोले, मधुकर सावंत, अनिल कुलकर्णी व तुकाराम चव्हाण यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात झाले. स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अतिथी परिचय सचिव अनिल कुलकर्णी यांनी करून दिला.
जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष सीए. शिरीष गोडबोले यांचे हस्ते श्रीनिवास पाटील यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. संस्थेच्या कार्यात व शाळेच्या उभारणीत बहुमोल योगदान देणारे हितचिंतक मधुकर सावंत, जितेंद्र कुंदोई, विद्याधर भागवत, कुमठेकर, प्रदीप इमानदार, रवळनाथ शेंडे यांचा सन्मान खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
हितचिंतकांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या स्मृती जपण्यासाठी ज्यांच्या नावे देणगी दिली आहे, त्यांच्या सन्मानार्थ तयार करण्यात आलेल्या फलकांचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यानंतर सरस्वती विद्यालय शाळेतील क्रीडा स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणारे खेळाडू वेदांत कुंभार, सिद्धी भुतकर, आर्यन लोहार, चिन्मयी आफळे यांना शाळेतील ‘सर्वोत्कृष्ट खेळाडू ‘ पुरस्कार, शौर्य पवार व वेदश्री माळवदे या सर्वाधिक वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘ वाचन विधायकता पुरस्कार ‘.
तर शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये सर्वाधिक वाचन करणारे राहुल मोरे, गौरी जाधव, नीलिमा पाटील यांना ‘ उत्तम वाचक शिक्षक पुरस्कार ‘ या जनकल्याण प्रतिष्ठान व सरस्वती शैक्षणिक संकुलच्यावतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे वितरण खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. राज्य नवोपक्रम स्पर्धेतील क्रमांक प्राप्त शिक्षिका प्रियांका थोरवडे व माधुरी कांबळे यांचा स्पर्धेतील यशाबद्दल सन्मान करण्यात आला.
खासदार श्रीनिवास पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांच्या शैक्षणिक जीवनातील आठवणी व मिळवलेली गुणवत्ता सांगून विद्यार्थ्यांनी उत्तम शिक्षण घेवून उच्च गुणवत्ता प्राप्त करावी व नेहमी उच्चतम ध्येय ठेवावे. विद्यार्थ्यांना शिक्षकांनी व शैक्षणिक संस्थांनी सर्व त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन केले. सरस्वती शैक्षणिक संकुलतील मराठी माध्यमाची शाळा दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहे. डॉ.सायरस पूनावाला सीबीएसई शाळा सुरू करून जनकल्याण प्रतिष्ठानने कराड परिसरातील विद्यार्थ्यांना अशी सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार श्रीनिवास पाटील यांचे सुद्धा शाळेस नेहमीच अनमोल सहकार्य व विशेष मार्गदर्शन राहिलेले आहे, असे शिरीष गोडबोले यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगून समाजातील अनेक दातृत्व लाभलेल्या व्यक्तींची यासाठी साथ मिळाली याबद्दल त्यांचे आभारही मानले.
रवळनाथ शेंडे यांनी पालकांनी व विद्यार्थ्यांनी भविष्यातील स्पर्धा लक्षात घेवून शिक्षणाकडे लक्ष द्यावे, असा अनमोल सल्ला विद्यार्थी व पालकांना दिला.
आभार सुनील मुंद्रावळे यांनी मानले. पसायदान होऊन कार्यक्रम संपन्न झाला. सूत्रसंचालन भारती मोहिते तर कार्यक्रमाचे नियोजन संचालक दीपक कुलकर्णी, श्रीपाद कुलकर्णी, नितीन गिजरे, संतोष देशपांडे, राजेश काळे, समन्वयक विजय कुलकर्णी, महेंद्र जोशी यांनी केले. कार्यक्रमास संचालक, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, हितचिंतक, पालक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.