विटेवर प्रकटला विठुराया! आठवीतील राजेश्वरीची अनोखी भक्ती-कला – changbhalanews
आपली संस्कृतीशैक्षणिक

विटेवर प्रकटला विठुराया! आठवीतील राजेश्वरीची अनोखी भक्ती-कला

कराड प्रतिनिधी, दि.६ | चांगभलं वृत्तसेवा
“विठोबा विटेवर, कर कटि ठेवून | आळंदीच्या राणात, उभा भक्तांसाठी॥” जगद्गुरु संत तुकोबाराय यांनी वर्णन केलेला हा पंढरीचा विठुराया, आणि त्याचा हा भाव भक्तांसाठी असलेल्या प्रतीक्षेचं प्रतीक आहे. ‘विटेवर उभा असलेला पांडुरंग’ हा वारकरी भाविकांना प्राणाहून प्रिय आहे, विठ्ठलाचं हे रूप आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या राजेश्वरीनं भक्ती आणि कलेचा संगम घडवत, चक्क विटेवरच रेखाटलं. राजेश्वरीच्या या कलाकृतीचं आज सर्वत्र कौतुक होतंय.

कु. राजेश्वरी विकास पाटील , असं या कलाकुशल विद्यार्थिनीचं नाव.‌ माजी मंत्री जयंत पाटील यांच्या कासेगाव शिक्षण संस्थेच्या कासेगाव (जि. सांगली) येथीलच आझाद विद्यालयाची ही विद्यार्थिनी. राजेश्वरी आणि तिचे कुटुंबीयांची पंढरीच्या विठुरायावर निस्सिम श्रद्धा आणि भक्ती आहे. या श्रद्धा आणि भक्तीला कलेची जोड देत राजेश्वरीने “विटेवर उभा असलेल्या विठ्ठलाचे” भक्तांना वेड लावणारे रूप चित्रकृतीच्या माध्यमातून प्रत्यक्ष विटेवरच रेखाटण्याचं ठरवलं. तिच्या या प्रयत्नांना मुख्याध्यापक एस. एस. पवार सर यांचा प्रोत्साहन, तर कलाशिक्षक अरविंद कोळी सर यांचं मार्गदर्शन लाभलं. आणि त्यामधून अवघ्या 45 मिनिटात राजेश्वरीने विटेवर उभा असलेल्या विठ्ठलाचे चित्र चक्क विटेवरच रेखाटलं.

विटेवरच हे विठुरायाचं लोभस रूप पाहणाऱ्याला “पंढरीनाथ साक्षात समोर उभा आहे!” असा भास झाल्याशिवाय राहत नाही. ही भक्तीची कल्पना तिने सर्जनशीलतेतून अशा प्रकारे उतरवली, की ग्रामस्थांसह शिक्षकवर्गही भारावून गेला.

या भक्ति-श्रद्धेच्या आणि कलेच्या संगमातून राजेश्वरीने साकारलेली कलाकृती केवळ चित्रकलाच नव्हे, तर वारकरी परंपरेतील “कला ही देखील एक उपासना आहे” ही भावना ठळक करणारी ठरली आहे.
ही कलाकृती म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि परंपरेच्या सन्मीलनाचा एक हृदयस्पर्शी अनुभव आहे. तिच्या या कृतीसाठी शाळेतील शिक्षक, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी सर्वजणच तिचे आणि तिच्या कलाशिक्षकांचे कौतुक करत आहेत.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close