कराडचा विनीतकुमार घेणार सोमवारी जैन संत परंपरेची दीक्षा

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
मानवी जीवन हे काही ना काही हेतूने परमेश्वराने देऊ केले आहे, जे हे जाणतात ते आयुष्यभर आध्यात्मिक मार्ग स्वीकारतात. अन्यथा लोक पैसे मिळवण्यात आणि सुख शोधण्यात आयुष्य घालवतात. आध्यात्मिक मार्ग हा प्रत्येक धर्माचा आणि पंथाचा वेगवेगळा असतो, विषयांची विरक्ती घेऊन वृत्तस्थपणे आणि साधेपणाने आयुष्यभर तीर्थकार भगवान महावीरांनी दिलेला मार्ग स्वीकारणे म्हणजे जैन संत परंपरेची ‘जैन दीक्षा’! कराडचा युवक विनितकुमार ईश्वरजी परमार हा सोमवार दिनांक 15 एप्रिल रोजी जैन धर्मियांचे गुरु भगवंत परमपूज्य आचार्य श्री अजितशेखरजी महाराजसाहेब यांच्या उपस्थितीत “जैन दीक्षा” घेत आहे
प्रत्येकाचे चांगले आणि सुखी जीवन जगण्याचा कल असतो. त्यासाठी कोणी भरपुर शिक्षण घेऊन चांगली नोकरी मिळवतो, कोणी व्यवसाय करतो, कोणी उत्तम शेती करतो , कोणी खेळात नाव कमवतो, कोणी सैन्यात जातो, कोणी विज्ञान-तंत्रज्ञानात प्रगती करतो, परंतु कराड शहरातील एक युवक विनितकुमार ईश्वरजी परमार याने जीवनातील सर्व सुखांना त्यागून आपले जगण्याचा निर्णय घेतला आहे.
विनीतकुमार याने भगवान श्री महावीर यांनी स्वतःच्या आणि सर्व जगाच्या कल्याणासाठी दाखवलेला जैन संतांच्या परंपरेचा मार्ग म्हणजेच “जैन दिक्षा” स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या मार्गात संपुर्ण जिवनभर कुठल्याही स्त्रीयांशी संबंध ठेवायचा नाही, संपुर्ण जिवनभर पैशाला स्पर्श सुध्दा करायचा नाही, संपूर्ण जिवनभर हॉटेल, गाडे, आदीचे स्वादिष्ट, रुचकर, चविष्ट जेवण गेले नाही, संपुर्ण जीवनभर मोबाईलचा वापर करणे नाही, अथवा कोणत्याही ईलेक्ट्रॉनिक वस्तुंचा उपयोग घेणे नाही, संपुर्ण आयुष्यभर आई-वडीलांच्या घरी जाणे नाही, कुठल्याही जिवांची हिंसा करणे नाही, असे नियम पाळावे लागतात.
पांढरे कपडे सोडून कुठलेही रंगीत कपडे घालणार नाही. शरीरावर कधीही कोणतही अलंकार धारण करणार नाही, आयुष्यभर केस कापण्यासाठी शस्त्रांचा उपयोग करणार नाही , असा निश्चय करणे म्हणजे जैन दीक्षा घेणे असते. त्यामध्ये कोठेही जायायचे असेल तर गाडीचा उपयोग न करता, पायी चालत जायचे, गावो गावी धर्मशाळा किंवा जेथे पण मिळेल तिथे रहायचे, असा कठीण मार्ग स्वीकारावा लागतो. विनीतकुमारने हा निश्चय केला आहे.
अंबट असो किंवा कडू असो, तिखट असी किंवा गोड असो, अशा कुठल्याही चवीच्या खाद्य पदार्थांची आवड ठेवता येत नाही, फक्त सर्व मनुष्याचे कल्याण हा हेतू ठेवून जीवन जगायचे हा मार्ग म्हणजे जैन दीक्षा होय. कराड शहरातला उमदा तरुण विनितकुमार ईश्वरजी परमार हा ही जैन दीक्षा सोमवार, दि. १५ एप्रिल २०२४ रोजी परमपूज्य आचार्य अजितशेखरजी महाराजसाहेब यांच्या उपस्थितीत घेणार आहे, अशी माहिती निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.