उंब्रज येथे उड्डाणपूलासाठी ग्रामस्थांची एकजूट ; जबरदस्तीने काम सुरू केल्यास एम. एच ४८ बंद पाडू
पत्रकार परिषदेत सर्व पक्षीय ग्रामस्थांचा पत्रकार परिषदेत इशारा
चांगभलं ऑनलाइन | उंब्रज प्रतिनिधी
उंब्रज ता.कराड येथे कराडच्या धर्तीवर सेगमेंटल पूल व्हावा यासाठी उंब्रज पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी रविवार दि.११ रोजी सकाळी ११ वाजता सौभाग्य मंगल कार्यालयात एकत्रित येऊन सर्वपक्षीय पदाधिकारी,ग्रामपंचायत पदाधिकारी व परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने शासन दरबारी मागणी करण्यासाठी प्रसंगी आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला तरी बेहत्तर परंतु आता मागे हटायचे नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. यासाठी मोठ्या संख्येने गर्दी करीत सर्वपक्षीय पदाधिकारी ग्रामस्थ आक्रमक झाले होते.
तारळी व शिवडे येथील नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी ठेकेदार मवाळ धोरण घेत आहे . परंतु आम्ही उड्डाणपूलाचा सकारात्मक निर्णय झाल्याशिवाय दोन्ही नदीवरील पुलाचे काम होऊ देणार नाही या भूमिकेवर नागरिक ठाम आहेत. शासनाने दडपशाही करून उंब्रज परिसरातील जनतेची संविधानिक मागणी दाबण्याचा प्रयत्न केल्यास जनतेच्या सोयीसाठी प्रसंगी कठोर भूमिका घ्यावी लागेल, असे मत सरपंच योगराज जाधव व ग्रामस्थांनी यांनी यावेळी व्यक्त केले.