मुख्याध्यापकासाठी ग्रामस्थांनी केलं आंदोलन… कुठे घडला प्रकार! – changbhalanews
शैक्षणिक

मुख्याध्यापकासाठी ग्रामस्थांनी केलं आंदोलन… कुठे घडला प्रकार!

कराड, दि. 24 | चांगभलं वृत्तसेवा
कराड तालुक्यातील शैक्षणिकदृष्ट्या उल्लेखनीय ठरलेली वहागाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गेल्या तीन वर्षांपासून पूर्णवेळ मुख्याध्यापकाविना कार्यरत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तीव्र भावना व्यक्त करत आज शाळा व्यवस्थापन समितीने आदर्श सरपंच संग्राम पवार यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती कराड येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात धरणे आंदोलन छेडले.

वहागाव शाळा ही पहिली ते चौथीची कराड तालुक्यातील सर्वाधिक पटसंख्या व उत्कृष्ट भौतिक सुविधांनी परिपूर्ण शाळा म्हणून ओळखली जाते. शाळा ‘मुख्याध्यापक पात्र’ असूनही, मागील तीन वर्षांपासून येथे स्थायी मुख्याध्यापकाची नेमणूक झाली नसल्यामुळे व्यवस्थापन व पालकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

शाळा समितीने वेळोवेळी शिक्षण विभागाकडे निवेदन व पाठपुरावा केला. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अखेर समितीला धरणे आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला. कराडच्या गट शिक्षणाधिकारी कार्यालयात आंदोलन सुरू असताना, सातारा येथील जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी फोनवरून एका महिन्याच्या आत पूर्णवेळ मुख्याध्यापक नियुक्त करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते थांबवण्यात आले.

या आंदोलनामुळे ग्रामस्थांमध्ये शिक्षणासाठी असलेली जागरूकता आणि शाळेच्या प्रगतीसाठीची बांधिलकी अधोरेखित झाली असून, यामुळे शिक्षण प्रशासनावर दबाव निर्माण झाला आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close