विजय दिवस समारोह म्हणजे कराडच्या सांस्कृतिक इतिहासातील सोनेरी पान
कर्नल संभाजीराव पाटील तथा आमचे दाजी हे माझा मित्र चंद्रकांत जाधव यांच्या मोठ्या बहीणीचे पती त्यामुळे ते आम्हा सर्व मित्रांचे आदरणीय दाजी. ते ज्या-ज्या वेळी कराडला यायचे त्या-त्या वेळी नेहमी आम्ही त्यांना आवर्जुन भेटत असे.सध्या आम्ही काय करतो याची माहीती घ्यायचे व त्यांच्याकडुन नवनवीन माहीती आम्ही घेत असु.त्यांच्या बोलण्यात नेहमी एक विषय असायचा की तरुण पिढीसाठी काहीतरी आदर्शवत उपक्रम घ्यावा जेणे करुन युवकांचा समाजिक वावर सहज सुंदर होईल. दाजींचा वावर खुप मोठ्या व कर्तत्ववान मंडळीत असल्याने ते आम्हाला वेगवेगळ्या उपक्रमांची माहीती द्यायचे त्यांचे म्हणणे आम्हाला कळत होते पण नेमके काय व कसे करायचे याबाबत आम्ही अनभित्न होतो.
साधारण १९९६-९७ साल असावे आम्ही जाधवांच्या घरी दाजींसोबत गप्पा मारत बसलो होतो त्यावेळी मी त्यांना कराड जिमखान्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक उपक्रम घेतला होता त्या उपक्रमाच्या निमित्ताने आमचा महावाद्यालयीन तरुण-तरुणींशी संपर्क आला या संपर्कात आम्हाला बहुतेक विद्यार्थी गुटखा,सिगारेट, तंबाखु व अन्य व्यसनात गुरफटलेले आढळले अशी माहीती दिली.ही बाब पुढच्या पिढीच्या दृष्टीने खुपच गंभीर असल्याचे दाजी म्हणाले व तरुण पिढीला आयुष्याचे नुकसान करण्यापासुन कसे परावृत्त करावे यावर बरीच चर्चा झाली या चर्चेत तरुणांसमोर काहीतरी आदर्शवत उदाहरण ठेवणे गरजेचे आहे यावर वेगवेगळ्या पर्यायांवर विचार झाला.सरते शेवटी भारतीय लष्कराची तरुण पिढीला ओळख करुन देवुन लष्कराचा आदर्श त्यांच्यापुढे ठेवायचा याबाबत एकमताने ठरले.यावेळी कर्नल साहेबांनी भारतीय सैन्याने आपल्या पराक्रमाने बांगला देशाला स्वातंत्र्य मिळवुन दिले त्याचा गौरव म्हणुन १६ डिसेंबरला देशात विविध ठिकाणी विजय दिवस साजरा केला जातो आपणही कराडमधे विजय दिवस साजरा करु व या निमित्ताने भारतीय लष्कराची तरुणांना ओळख करुन देवु. कराड सारख्या ग्रामीण भागात हा उपक्रम आयोजित करणे खरे तर खुपच अवघड होते पण कर्नल संभाजीराव पाटील यांची दुर्दम्य इच्छाशक्ती,लष्करातील वरिष्ठांशी असलेले उत्तम संबंध व अथक प्रयत्नातुन हा समारोह अस्तित्वात आला.
नियोजनाची सुरवात कराडचे ज्येष्ठ नेते स्व.पी.डी पाटील यांच्यापासुन सुरु केली मी व दाजी त्यांना भेटायला गेलो दाजींना बघताच या जावाईबापु काय काम काढले अशी विचारणा करत अन्य कौटुंबिक चर्चा झाल्यावर दाजींनी विजय दिवस समारोहाची कल्पना मांडली. समारोहाचा उद्देश पीडींनाही मनोमन पटला व त्यांनी कर्नल साहेबांना सांगितले माझ्याकडुन जी काही मदत हवी असेल ती नि:संकोचपणे हक्काने मागा तुम्ही आमचे जावाई आहात…
त्यानंतर नगराध्यक्ष जयवंत जाधव यांना भेटलो त्यांनी तर या उपक्रमाला लागेल ते सहकार्य करणारच पण एक कार्यकर्ता म्हणुनही प्रत्यक्ष तुमच्याबरोबर कामही करणार आहे. खरेतर जयवंत जाधवांनी केवळ न बोलता त्यांनी या उपक्रमाला जे सहकार्य केले केवळ त्यामुळेच विजय दिवस समारोहाचा पाया रोवला गेला.रजिस्टार भोसलेही उत्साहाने सहभागी झाले,तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल डिग्गिकर यांनीही सर्वोतोपरीने सहकार्य करण्याचे अश्वासन दिले मग आम्ही सर्वजण पहिल्या विजय दिवस समारोहाच्या तयारीला लागलो.
कराड सारख्या ग्रामीण भागात कर्नल साहेबांच्या महतप्रयासाने पहिला विजय दिवस समारोह ज्या उत्साहाने साजरा झाला त्याच उत्साहाने व अभिमानाने आज गेली पंचवीस वर्षे तो साजरा होतोय ते केवळ कर्नल संभाजीराव पाटील यांच्या राजकारण विरहीत सर्व समावेशक व समाजभिमुख भुमिकेमुळेच कराडकरांना हा आपला उत्सव वाटतो. समारोहाच्या त्या तीन-चार दिवसात संपुर्ण कराड शहर भारावुन गेलेले असते.कराड शसर परिसराबरोबर सातारा, सांगली,कोल्हापुर,रत्नागिरी जिल्ह्यातुनही अनेक मंडळी आवर्जुन येतात.चाळीस- पन्नास हजारावर गर्दी जमते पण गेल्या पंचवीस वर्षात एकही अनुचित प्रकार घडला नाही.लष्करी वातावरणात भारावलेला प्रत्येकजण स्फुर्ती घेवुनच जातो.
कराड शहराला देशाच्या नकाशावर मानाचे स्थान देणारे, देशाचे संरक्षण मंत्री म्हणुन अलौकीक कामगिरी करणारे कराडचे सुपुत्र स्व.यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या पवित्र समाधीला अभिवादन करुन पहिल्या विजय दिवस समारोहाची सुरवात छ.शिवाजी स्टेडीयमवर झाली.आता तर प्रत्येक वर्षीच्या विजय दिवसाच्या सुरवातीला सहभागी झालेल्या लष्करी जवानांकडुन साहेबांच्या समाधीला अभिवादन करण्याची प्रथाच पडली.चव्हाण साहेबांच्या कार्याची ही अनोखी दखल केवळ विजय दिवस समारोहाने घेतली.
छ.शिवाजी महाराजांचे लष्कर प्रमुख हंबीरराव मोहीतेंच्या पराक्रमाची महती याच विजय दिवसामुळे पंचक्रोशी गेली. राज्य शासनाने हंबीररीव मोहीतेंच्या समाधीचे देखणे नुतनीकरण केले याचे बरेचसे श्रेय विजय दिवस समारोहाला जाते.आज पर्यतच्या प्रत्येक विजय दिवस समारंभात सहभागी झालेल्या वरिष्ठ लष्करी अधिकार्यांनी या समाधीला भेट देवुन अभिवादन केले आहे.
लष्कराची शिस्तबध्द कवायत, बाॅम्ब शोधक पथकांचे प्रात्यक्षिक, लष्कराचा डाॅग शो,पॅरा ग्लायडींग, डेअर डेव्हील्सचे अप्रतिम मोटार सायकल प्रात्यक्षिक, प्रत्यक्ष युध्दाची रणनिती,सुर्खोई विमानांची आकाशातील कसरत, लष्कर व पोलीस बॅंड पथकांचे उत्तम सादरीकरण हे कराड सारख्या ग्रामीण भागातील अबालवृध्दांचे आकर्षण ठरले. या बरोबरच बोफोर्स तोफा,रणगाडे, लष्कराची वहाने,विविध शस्ञे व शुरवीरांची छायाचित्रे यांचे प्रदर्शन हे सर्वसामान्य नागरीकांसाठी औत्सुक्याचा विषय ठरला. या निमित्ताने होणारी विजय दिवस दौड, व लष्कराच्या संचालनाने कराड शहरातील वातावरण लष्करी सामर्थ्याने अक्षरश: भारावुन जाते.
केवळ कर्नल संभाजीराव पाटील यांच्या प्रयत्नानेच मराठा लाईट इंफ्रंटी,अहमद कोर रेजिमेंट,बाम्बे इंजिनिअरींग ग्रुप,आर्मी डाॅग युनिट,६१ कॅव्हलरी एअर फोर्स, पॅरा ग्लायडिंग सेंटर आग्रा, मद्रास रेजिमेंट,गार्ड रेजिमेंट सेंटर नागपुर डेअर डेव्हील्स बेंगलोर व जबलपुर, आर्टलरी सेंटर,नागपुर, सिल्व्हर बॅंड आॅफ मराठा लाईट इंफ्रंटी या लष्कराच्या विविध ग्रुप बरोबरच सातारा, सांगली व कोल्हापुर येथील पोलीस बॅड पथकांनी नियमित हजेरी लावुन आपले कसब दाखविले.प्रत्येक सहभागी लष्कराच्या ग्रुपचा सन्मान व बडाखाना हेही या समारोहाचे आकर्षण ठरले तर ३००० हजार फुटांवरुन पॅरा ड्राॅप करण्याचा जागतिक विक्रमही याच विजय दिवस समारोहात घडला. यानिमित्ताने सुंदर शाळा,स्वच्छ शाळा,रक्तदान शिबिरे असे सामाजिक उपक्रमही आयोजित केले जातात याला समाजाचा उस्फुर्त प्रतिसाद असतो.
विजय दिवस समारोहातील महत्वपुर्ण उपक्रम म्हणजे जीवन गौरव पुरस्कार कराड व परिसरात शेती,शिक्षण,अर्थ,आरोग्य व समाजकारणात ज्या नामवंतांनी अमुल्य कार्य केले अशा दिग्गजांना लष्कराच्या प्रमुख व्यक्तिंकडुन सन्मानित करण्यात येते या उपक्रमामुळे कराड परिसरातील अनेक नामवंतांचे कार्य समाजापर्यत पोहोचले ते केवळ कर्नल साहेबांच्या कल्पकतेमुळेच.
लेफ्ट.जन.चीमा,लेफ्ट.जन.व्यंकटेश पाटील,लेफ्ट.जन.पी.जे.एस. कन्नु,एअर मार्शल अशोक भोसले, अंदमान निकोबारचे गव्हर्नर, ब्रिगेडीयर जेम्स थाॅमस,ब्रिगेडीयर गोविंद अलंगवार, लेफ्ट.कमांडर वीणा खांडेकर अशा अनेक लष्कराच्या मान्यवरांची उपस्थिती समारोहाचा दर्जा उंचावणारी ठरली तर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर,हाॅकी खेळाडु पिल्ले, मिस इंडीया थापर,उद्योजक हिरानंदानी यांच्या सहभागाने समारोहाची शोभा वाढली.
विजय दिवस समारोहाच्या पंचवीस वर्षाच्या वाटचालीत कर्नल संभाजीराव पाटील यांच्या पुढाकाराने सदगुरु गाडगे महाराज काॅलेजच्या सहकार्याने कराडमधे सैनिक प्रशिक्षण केंद्र सुरु करुन तरुणांना संधी दिली.
स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांना मानवंदना म्हणुन यशवंराव चव्हाण स्मृति सदनामधे रणगाडा व विमान बसवुन त्याचे लोकार्पण केले.तर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी विजय स्तंभाची उभारणी केली.कर्नल साहेबांच्या पाठपुराव्यामुळेच कराडमधे माजी सैनिकांसाठी लष्कराचे कॅन्टीन सुरु झाले.
तरुणांची मानसिकता बदलण्याची ताकद असलेल्या विजय दिवस समारोहाची आखणी व मांडणी अत्यंत उदात्त हेतुने कर्नल संभाजीराव पाटील यांनी केली याला लष्कर,समाज व नियतीने भरभरुन साथ दिली केवळ यामुळेच कराडकरांना या समारोहाचा रौप्य महोत्सव साजरा करण्याचे भाग्य लाभले.
भारतीय लष्कराचे सामर्थ्य नव्या पिढीला समजावे व त्यातुन त्यांनी प्रेरणा घेवुन आपले व्यक्तिमत्व घडवावे या उदात्त हेतुने कर्नल संभाजीराव पाटील यांनी या समारोहाची निर्मिती केली गेल्या पंचवीस वर्षात केवळ कराडच नाही तर सर्व पश्चिम महाराष्र्टातील अबालवृध्दांनी उस्फुर्त प्रतिसाद देत या उपक्रमाला देश पातळीवर नेले तर विजय दिवस समारोहाने सातारा जिल्ह्याच्या सांस्कृतिक इतिहासात मानाचे पान कोरले आहे.
विजय दिवस गेली पंचवीस वर्षे ज्या छ.शिवाजी स्टेडीयमवर संपन्न होत होता मात्र स्टेडीयमची प्रेक्षागॅलरी कमकुवत झाल्याने कोणताही अनर्थ ओढवु नये म्हणुन स्टेडीयमवरील सर्व कार्यक्रम रद्द करावे लागत आहेत साहजीकच यावर्षीपासुन आता लष्कराच्या कवायती,साहसी करामती आपल्याला पहायला मिळणार नाहीत.परंतु कराडच्या सांस्कृतिक इतिहासात मोलाची भर टाकणार्या विजय दिवसाच्या स्मृति चिरंतन रहाव्यात यासाठी लष्करी आयुधांचे कायम स्वरुपी देखणे संग्रहालय उभे करण्याचा समिती नियोजन करीत आहे.
– सुधीर एकांडे,
कराड.