सांगली जिल्ह्यात ऊसदर आंदोलनाला जोर
राजारामबापू कारखान्याच्या काट्यावर राजू शेट्टी ठाण मांडून
चांगभलं ऑनलाइन | इस्लामपूर प्रतिनिधी
कोल्हापूर प्रमाणे उसाला पहिली उचल एफआरपी अधिक शंभर रुपये मिळावी, या मागणीसाठी जाहीर केल्याप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी इस्लामपूर जवळच्या राजारामबापू साखर कारखान्याच्या वजन काट्यावर आजपासून (शुक्रवार) ठाण मांडून आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे बाहेरून कारखान्यात होणारा ऊस पुरवठा थांबला असून कारखान्याच्या गेटच्या आतमध्ये जोपर्यंत ऊस आहे तोपर्यंतच कारखाना सुरू राहणार आहे. या आंदोलनामुळे सांगली जिल्ह्यात ऊसदर आंदोलनाने जोर धरल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात ऊसदारासाठी पंचगंगा पुलावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी जोरदार आंदोलन करत महामार्ग तब्बल सात तास रोखून धरला होता. बंद पडलेल्या महामार्गावर त्यांनी शेतकऱ्यांच्या जेवणावळीच्या पंगती बसवल्या होत्या. या आंदोलनाची कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी तातडीने दखल घेत प्रशासनाच्या समन्वयातून मार्ग काढला. त्यातून ज्या कारखान्यांनी तीन हजार रुपयांच्या आतमध्ये गतवर्षी दर दिला आहे त्यांनी अतिरिक्त शंभर रुपये द्यावेत तर ज्या कारखान्याने ३००० पेक्षा जास्त दर दिला आहे, त्या कारखान्यांनी अतिरिक्त पन्नास रुपये द्यावेत असा निर्णय झाला. तर यंदा गळिताला जाणाऱ्या उसाला एफआरपी अधिक शंभर रुपये पहिली उचल देण्याचा तोडगा मान्य करण्यात आला. मात्र हा कोल्हापूर जिल्ह्यासाठी निर्णय झाला होता, सांगली आणि सातारा जिल्ह्यात अद्याप असा काहीही निर्णय झाला नसल्याने राजू शेट्टी यांनी सांगली जिल्ह्यातील राजारामबापू साखर कारखान्यावर १ डिसेंबर पासून ते बेमुदत आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला होता.
राजू शेट्टी यांनी जाहीर केल्याप्रमाणे आज शुक्रवार दि. १ डिसेंबरपासून राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वजन काट्यावर आंदोलन सुरू केले आहे. गेले दोन तास हे आंदोलन सुरू असल्याने कारखान्याकडे येणारा ऊस पुरवठा थांबला आहे. गेटच्या आतील ऊस आहे तोपर्यंत कारखाना सुरू राहील, नंतर कारखाना बंद पडेल, अशी शक्यता आहे. राजू शेट्टी हे त्यांच्या स्वाभिमानी संघटनेचे सर्व पदाधिकारी, शेतकरी यांच्यासमवेत या ठिकाणी ठाण मांडून आहेत.
जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणला…
ऊसाला एफआरपी अधिक शंभर रुपये मिळालेच पाहिजेत, मागील चारशे रुपये मिळालेच पाहिजेत, ऊस आमच्या घामाचा नाही कुणाच्या बापाचा, ऊसाला दर मिळालाच पाहिजे, अशाच जोरदार घोषणा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केल्या. त्यामुळे कारखान्याचा परिसर दणाणून गेला.
शासन आणि प्रशासनाच्या भूमिकेकडे शेतकऱ्यांचे लक्ष…
ऊस दरासाठी राजारामबापू साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनाची व्याप्ती सांगली जिल्ह्यात पसरत असून सांगली जिल्ह्यात ऊसदर आंदोलन जोर धरत आहे. त्यामुळे प्रशासन आणि शासन ऊस दराच्या प्रश्नासंदर्भात काय तोडगा काढते याकडे शेतकऱ्यांसह सांगली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.