भारतातील अशी दोन गावं, जिथं फटाकेच वाजवले जात नाहीत
चांगभलं ऑनलाइन |
जगभरात सर्वत्र सध्या दिवाळी साजरी होतेय. दिवाळी हा दिव्यांचा सण, फटाके फोडून आणि नवीन कपडे, मिठाई घेऊन दिवाळीचा आनंद साजरा केला जातो. खरेदी-विक्रीच्या माध्यमातून फटाका उद्योगाची मोठी उलाढाल होत असते. मात्र अशीही दोन गावं आहेत, जिथं गेल्या कित्येक वर्षात आजवर फटाकेच फोडले गेले नाहीत. ही दोन्ही गावं आपल्याच भारत देशात आहेत.
तमिळनाडूतील तिरुपत्तूर जवळील वेतांगुडीपट्टी आणि पेरिया कोल्लुकुडीपट्टी ही ती फटाके न फोडणारी दोन गावं आहेत. या दोन गावातील ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून फटाके न फोडता दिवाळी साजरी करतात.
कारण समजून घ्या
फटाके न फोडण्यामागे त्याचे कारणही आहे, त्याबाबत या गावातील ग्रामस्थांंचे असे म्हणणे आहे की, “पक्षांना सुरक्षित वातावरण राहावे, म्हणून आम्ही फटाके फोडत नाही. आम्ही आपल्या पाळीव प्राण्यासारखी निसर्गातील पक्षांची काळजी घेतो, म्हणून आम्ही फटाके फोडणे पूर्णपणे टाळतो. आमच्या मुलांनाही आम्ही याबाबत सांगत असतो, त्यामुळे ते ही पक्ष्यासाठी फटाके फोडत नाहीत. कित्येक वर्षे झाली, पण गावात आम्ही कधीही फटाके वाजवून दिवाळी साजरी केलेली नाही,”
ग्रामस्थांच्या या निर्णयामुळे नेमकं काय झालंय..
ग्रामस्थांच्या फटाके न फोडण्याच्या या निर्णयामुळे वेतांगुडी हे पक्ष्यांचे अभयारण्य झाले आहे. हिवाळी स्थलांतरित पक्ष्यांसाठी हा परिसर नैसर्गिक अधिवास झाला आहे. हे पक्षी स्वित्झर्लंड, रशिया, इंडोनेशिया आणि श्रीलंका येथून उड्डाण करून या दोन्ही गावच्या परिसरात येत असतात. या अभयारण्यात दरवर्षी सरासरी 15,000 पक्षी येत असतात. स्थलांतरित पक्ष्यांच्या 200 हून अधिक प्रजातींसाठी ही दोन्ही गावं म्हणजे सुरक्षित आणि संरक्षित प्रजनन स्थळांचे अभयारण्य मानली गेली आहेत. विविध पाहुणे पक्षी कित्येक वर्षापासून वेतांगुडी, पेरिया कोल्लुकुडी पट्टी आणि चिन्ना कोल्लुकुडी पट्टी भागातील सिंचन तलावांच्या ठिकाणी येत असतात. काही वर्षांपूर्वी फटाक्यांमुळे त्यांच्या मनात भीती निर्माण होऊन पाहुण्या पक्षांची संख्या घटली, त्यामुळे तेंव्हापासून स्थानिक ग्रामस्थांनी दिवाळीसह सर्वच उत्सव हे फटाकेविरहित साजरे करण्यास सुरुवात केली. ते आजही सुरू आहे. त्यामुळे आता पशू-पक्षी यांच्यासाठी येथे सुरक्षित अधिवास निर्माण झाला आहे.
ग्रामस्थांच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक, चर्चा होत असते. या निर्णयामुळे वनविभागाच्यावतीने प्रत्येक दिवाळीला गावांतील रहिवाशांच्या प्रत्येक कुटुंबाला मिठाईचे वाटप केले जाते. मदुराईपासून ५१ किलोमीटर अंतरावर असलेल्या या अभयारण्याला पर्यटक आवर्जून भेट देतात. सण, उत्सव तर आपण साजरे केलेच पाहिजेत, पण पर्यावरणाचे, निसर्गातील पशू-पक्ष्यांची ही काळजी आपण घेतली पाहिजे हेच यानिमित्ताने लक्षात घेण्यासारखं आहे.