पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर अधीक्षक आंचल दलाल यांची बदली ; सुधाकर पठारे साताऱ्याचे नवे अधीक्षक तर अप्पर अधीक्षकपदी वैशाली कडूकर
चांगभलं | सातारा प्रतिनिधी – हैबत आडके
महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या गृह विभागाकडून करण्यात आलल्या आहेत. त्यानुसार साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक पदी सुधाकर बी. पठारे यांची तर नूतन अप्पर पोलीस अधीक्षक पदी वैशाली कडूकर यांची नियुक्ती झाली आहे.
साताऱ्याचे नूतन पोलीस अधीक्षक सुधाकर पठारे हे ठाणे शहर पोलीस उपायुक्त म्हणून काम पाहत होते. आता ते साताऱ्याचे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहणार आहेत तर साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांची मुंबई शहर पोलीस उपायुक्तपदी बदली झाली आहे.
साताऱ्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांची पुणे येथील राज्य राखीव पोलीस बल समादेशक पदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी साताऱ्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून वैशाली कडूकर या काम पाहणार आहेत.
सातारा पोलीस दलाची उंचावली प्रतिमा…
पोलीस अधीक्षक समीर शेख , अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी त्यांच्या कार्यकाळात सातारा पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केला. अनेक गुंडांच्या टोळ्यांना मोक्का लावला गेला . काही गुंडांच्या टोळ्यांच्यावर तडीपारीची कारवाई केली गेली. अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल झाली. त्यांच्या नेतृत्वात विशेष म्हणजे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कामगिरीचा आलेख नेहमीच चढता राहिला. प्रतापगडावरील अफजलखान कबरी भोवतीच्या अतिक्रमण काढण्याचा विषय असो किंवा अन्य गंभीर घटना असोत, त्या पोलीस दलाने नियंत्रित पद्धतीने हाताळल्या. लोकसभा निवडणुकीत ही पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला गेला.
अधीक्षक शेख व उपायुक्त पठारे यांच्या बदल्यांना तात्पुरती स्थगिती…
रात्री उशिरा अप्पर पोलीस महासंचालक (आस्थापना) यांनी एक आदेश काढून साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख व ठाणे शहर पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे या दोघांच्या बदल्यांना पुढील आदेशापर्यंत तात्पुरती स्थगिती दिली आहे. आदर्श आचारसंहिता व प्रशासकीय न्यायाधीकरण यांचा संदर्भ देत पुढील आदेशापर्यंत दोन्ही बदल्यांना तात्पुरती स्थगिती दिल्याचे अप्पर पोलीस महासंचालकांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.