
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
राज्य उत्पादन शुल्क तथा कराडच्या दारूबंदी विभागाने नारायणवाडी ता. कराड गावच्या हददीत गोवा बनावटीची दारू व वाहतुकीसाठी वापरलेली वाहने मिळून तब्बल ८२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. शनिवार, दिनांक २१ रोजी सकाळी ही कारवाई करण्यात आली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, रत्नागिरीकडुन-कराडच्या दिशेने काही वाहनांमधून भुस्सा भरलेल्या गोण्यामधून महाराष्ट्र राज्यात विक्रीस मनाई असलेली गोवा बनावटीची विदेशी दारू कराड तालुक्यात आणण्यात येत असल्याची माहिती कराडच्या दारूबंदी विभागाला खबऱ्या कडून मिळाली होती. त्यावरून या पथकाने सापळा रचून नारायवाडी गावच्या हद्दीत कारवाई केली. या कारवाईत विनोद विलास काटकर रा. वसंतगड ता. कराड जि.सातारा, रामजी चंद्रकांत होनमाने,, मुस्ताक मुबारक नदाफ दोघे रा. जयभवानीगर, आटपाडी ता. आटपाडी जि.सांगली या तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईत गोवा बनावट विदेशी दारु १८० मि.ली. क्षमतेच्या एकूण ११०८८ सिलबंद बाटल्या, ७५० मि.ली ९४८ सिलबंद बाटल्या, बिअरचे ५०० मि.लीचे २४०० कॅन तसेच एक चौदा चाकी मालवाहू ट्रक, पायलटींग करिता वापरलेले एक चारचाकी वाहन, गुन्हयातील अवैध मद्यसाठा, ४ मोबाईल संच असा एकुण ८२ लाख ५ हजार ८८८ रूपये किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई करणाऱ्या पथकात निरीक्षक संजय साळवे, दुय्यम निरीक्षक शरद नरळे, सहा. दु. निरीक्षक नितीन जाधव, महेश मोहिते, सचिन खाडे, अजित रसाळ, , भिमराव माळी, सचिन जाधव, महिला जवान मुनिजा मुल्ला यांनी सहभाग घेतला. गुन्हयाचा अधिक तपास निरिक्षक संजय साळवे करीत आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक सुनिल चव्हाण, . कोल्हापूरचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, साताऱ्याच्या अधीक्षक किर्ती शेडगे यांच्या नेतृत्वाखाली ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, सातारा जिल्हयामध्ये बेकायदा गोवा बनावट दारुची विक्री, वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती दारूबंदी विभागाला तात्काळ द्यावी असे, आवाहन किर्ती शेडगे अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सातारा यांनी केले आहे.
दारूवाहतुकीसाठी वापरली अशी युक्ती…
गोण्यामध्ये भुस्सा भरून त्यामध्ये गोवा मेड दारूची बॉक्स लपवून या गोण्या ट्रकमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. अशा तब्बल ४५ गोण्या होत्या, त्यामध्ये सुमारे ११ हजार ८८ बाटल्या लपवण्यात आल्या होत्या. कोणाला शंका येऊ नये, अशी वाहतूक करण्यात येत होती, मात्र तरीही उत्पादन शुल्क तथा दारूबंदी विभागाच्या कराड कार्यालयाच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी ही दारू वाहतूक करणारी वाहने आणि संबंधित संशयित तिघांना ताब्यात घेत मोठी कारवाई केली.
या बातमीचा व्हिडिओ खाली क्लिक करून पाहू शकता