शैक्षणिक
सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा; सहा तालुक्यांतील प्राथमिक शाळांना दोन दिवस सुट्टी

सातारा, दि. 19 , चांगभलं वृत्तसेवा
हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या ऑरेंज अलर्ट पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील प्राथमिक शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिलेल्या सूचनेनुसार, पाटण, जावली, महाबळेश्वर, वाई, सातारा व कराड या तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळा बुधवार, दि. 20 ऑगस्ट व गुरुवार, दि. 21 ऑगस्ट रोजी बंद राहतील.
दरम्यान, कोरेगाव, खटाव, खंडाळा, माण व फलटण या तालुक्यातील शाळा बंद ठेवाव्या की नाही, याचा निर्णय तेथील गटविकास अधिकारी स्थानिक पर्जन्यस्थितीचा आढावा घेऊन घेणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा सुट्टीच्या काळात पालकांनी विशेष दक्षता घ्यावी, असेही आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नागराजन यांनी केले आहे.