कोयना बॅंकेच्या माध्यमातून कराडला उभारलेल्या लोकनेते विकासकाकांच्या पुतळ्याचे ‘हे’ आहे वैशिष्ट्य
सोमवारी होणार अनावरण ; कोयना सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीचेही होणार उदघाटन

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
लोकनेते दिवंगत माजी मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या कराड येथील कोयना सहकारी बँकच्या प्रशासकिय इमारतीच्या आवारात उभारलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचे खास असे वैशिष्ट्य आहे. कराड-तासगाव रस्त्यालगत बाजार समितीच्या आवारात उभारण्यात आलेला लोकनेते विलासकाकांचा हा पुतळा पंचधातूमध्ये बनवण्यात आला आहे. त्याची उंची नऊ फूट आहे. कोल्हापूर येथील प्रसिद्ध शिल्पकार यांनी ही कलाकृती तयार केली आहे. या माध्यमातून विलासकाकांच्या स्मृती चिरंतन जपण्याचा बँकेचा प्रयत्न आहे. याव्दारे नव्या पिढीला लोकनेते विलासकाका यांच्या जनसेवेच्या कार्याची प्रेरणा मिळत राहील, असा विश्वास बँकेचे संस्थापक, रयत संघटनेचे नेते, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी व्यक्त केला.
दरम्यान, कोयना सहकारी बँकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कार्यालयाचे उदघाटन व बँकेच्या आवारात उभा केलेल्या माजी मंत्री लोकनेते स्व. विलासकाका पाटील- उंडाळकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण लोकनेते स्व. विलासकाका पाटील यांच्या जयंतीदिनी सोमवार, दि. १५ जुलै रोज़ी दुपारी २ वाजता होणार आहे, अशी माहिती अँड उदयसिंह पाटील- उंडाळकर यांनी दिली.
भाई जयंत पाटील व वसंतदादांच्या नातवाची उपस्थिती…
ते म्हणाले, स्व. विलासकाका पाटील- उंडाळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे आ. भाई जयंत पाटील यांचे हस्ते होणार आहे. तर कोयना बँकेच्या प्रशासकीय इमारतीचे उदघाटन माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते आयोजित केले असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण हे असणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीमध्ये माजी राज्यपाल, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी सामाजिक न्याय मंत्री, माजी खासदार जयवंतराव आवळे, राज्यमंत्री आ. सतेज पाटील, माजी राज्य मंत्री आ. विश्वजीत कदम, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू व सांगलीचे नवनिर्वाचित खा. विशाल पाटील, आ. संग्राम थोपटे, विचारवंत मधुकर भावे, आ. अरुण लाड, आ. जयंत आसगांवकर यांसह सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. काकांच्या मार्गदर्शना खाली बँकेचा वटवृक्ष झाला असून या बँकेच्या मुख्य कार्यालयाचे उदघाटनाचे औचित्य साधून काकांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण समारंभ ही संचालक मंडळाने आयोजित केला आहे.
बँकेचा तीनशे कोटींचा व्यवसाय.. सतत ‘अ’ वर्ग…
बँकेच्या प्रगतीचा आढावा घेताना बँकेचे चेअरमन रोहित पाटील म्हणाले, कोयना सहकारी बँकेची स्थापना लोकनेते विलासकाका पाटील यांचे मार्गदर्शनाखाली 1996 साली सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे हस्ते झाली होती. आज बँकेच्या 11 शाखा व 1 विस्तारित कक्ष असून बँकेच्या ठेवी 177 कोटी, कर्ज वाटप 115 कोटी, असून एकत्रित व्यवसाय 300 कोटींचा आहे. बँकेने सतत ‘अ’ वर्ग मिळवला असून संस्थापक अँड. उदयसिंह पाटील यांचे मार्गदर्शनाखाली बँक ग्राहक व सभासद यांचे पसंतीस उतरली आहे.
बँकेच्या या कार्यक्रमास सर्व सभासद, ठेवीदार, तालुक्यातील शेतकरी, हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बँकेच्यावतीने बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील, उपाध्यक्ष विजय मुठेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जनार्दन माने यांनी यावेळी केले.