मराठा आरक्षणासाठी इंदुरीकर महाराजांनी घेतला ‘हा’ निर्णय
चांगभलं ऑनलाइन
राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण दिलं जावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी पाठिंबा दिला आहे. हा पाठिंबा जाहीर करताना त्यांनी पुढील पाच दिवस राज्यात कोठेही कीर्तन किंवा अन्य धार्मिक कार्यक्रम न करण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठा समाजाच्या आरक्षण मागणी आंदोलनाला राज्यात वेग आला आहे. प्रत्येक जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणी मोर्चे निघत असून ठीक ठिकाणी साखळी उपोषण तसेच आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला आणि यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेकजण पुढं येत आहेत. आज प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनीही आपला पाठिंबा जाहीर केला आहे. पुढील पाच दिवस ते कोणतेही कार्यक्रम किंवा कीर्तन राज्यात कोठेही करणार नाहीत असं सांगण्यात आलं आहे. इंदुरीकर महाराज स्पष्ट वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रात त्यांच्या कीर्तनाला मोठी मागणी असते. त्यामुळे त्यांच्या पुढील दोन ते तीन महिन्याच्या तारखांचे कार्यक्रम निश्चित झालेले असतात. त्याची मोठी पूर्वतयारी असते. त्यामुळे हे कार्यक्रम सहसा रद्द केले जात नाहीत, किंवा पुढे ढकलले जात नाहीत. मात्र मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा म्हणून इंदुरीकर महाराजांनी पुढील पाच दिवस कीर्तन सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे वृत्त आघाडीच्या वृत्तवाहिन्यांनी आज दिलं आहे.
दरम्यान, मनोज जरांगे-पाटील यांनी राज्यातील मराठा समाजाने साखळी उपोषणांचं रूपांतर आमरण उपोषणात करावं. त्याबाबतची निवेदने पोलिसांना द्यावीत, मराठी युवकांनी आत्महत्येसारखे मार्ग स्वीकारू नयेत. संयम ठेवावा. आपल्याला आरक्षण मिळणारच. आपली ऐकी फुटू देऊ नये, असं आवाहन केलं आहे.