आणे गावच्या युवकाचे राज्यसेवा परीक्षेत सुयश
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
आणे ता. कराड गावचा युवक विश्वजीत विलास देसाई याने नुकताच राज्यसेवेचा जो निकाल जाहीर झाला, यामध्ये राज्यात 324 वी रँक मिळवली. त्याची महिला बाल विकास अधिकारी वर्ग 2 या पदावर निवड झाली.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, गेली 7 वर्षे संघर्ष करत चार वेळा मुलाखत देऊन ही त्याची निवड झाली नव्हती. मात्र त्याने ध्येयाचा ध्यास सोडला नाही. आपल्या प्रयत्नावर विश्वास ठेवून, मनाला आशेचे पंख आहेत आणि अंत:करणात जिद्द आहे तोपर्यंत ध्येयप्राप्तीपासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही असा दृढ विश्वास ठेवून अखेर त्याने यशाला गवसणी घातली. यासाठी त्याला त्याचे मित्र IPS तुषार देसाई यांची खंबीर साथ मिळाली. तसेच आजोबा दिनकर देसाई , चुलते निवास देसाई , आई-वडील यांनी मोलाची साथ दिल्यामुळे घरातील सर्वांचेच स्वप्न साकार झाले.
याबाबत विश्वजीत देसाई याने सांगितले की, जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर योग्य नियोजन, प्रामाणिक कष्ट ,सकारात्मक दृष्टिकोन, अपयशातून शिकण्याची वृत्ती, सातत्य , आत्मविश्वास असणे फार गरजेचे आहे.
दरम्यान, एका शेतकरी मुलाची यशोगाथा पाहून गावातील युवकांना नक्कीच प्रेरणा मिळेल. या यशाबद्दल विश्वजीत देसाई याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.