मुख्यमंत्री चषकाचा मानकरी आज ठरणार
पुरुष आणि महिला गटाच्या सेमी फायनल व फायनल सायंकाळी सहापासून
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
येथील लिबर्टी मजदूर मंडळाच्या क्रीडांगणावर गेले चार दिवस सुरू असलेल्या मुख्यमंत्री चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतील महिला खुला गट व व्यावसायिक पुरुष गटाच्या सेमी फायनल व फायनलचे सामने शुक्रवारी सायंकाळी सहा पासून सुरू होणार आहेत. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. आज विविध मान्यवर स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थिती लावणार आहेत.
गेले चार दिवस महिला 35 किलो, 70 किलो, खुला गट व पुरुष व्यावसायिक गटाच्या स्पर्धा सुरू असून यास प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. काल रात्री उशिरापर्यंत झालेल्या साखळी सामन्यातून दोन्ही गटात आठ संघ सेमी फायनलला आले असून हे सामने आज सायंकाळी रंगणार आहेत.
पुरुष व्यावसायिक गटामध्ये इन्कम टॅक्स पुणे, संत सोपान काका संघ सासवड , साहित्य मुंबई पोर्ट मुंबई, मुंबई महापालिका मुंबई हे संघ सेमी फायनलला पोहोचले आहेत. तर महिला खुला गटामध्ये द्रोणा स्पोर्ट्स पुणे, महेश दादा स्पोर्ट्स पुणे, शिवशक्ती मुंबई, राजमाता जिजाऊ संघ पुणे हे संघ सेमी फायनलला पोहोचले आहेत.
लिबर्टी मजदूर मंडळ व रणजितनाना पाटील यांनी स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केले आहे. खेळाडूंची भोजन, निवास व वैद्यकीय व्यवस्था उत्तम करण्यात आली आहे.
स्पर्धेला राज्य कबड्डी असोसिएशनची मान्यता आहे. शुक्रवारी रात्री अंतिम सामना होणार असून त्यानंतर बक्षीस वितरण होणार आहे.