नवसाला पावणाऱ्या ‘या’ देवीचं मंदीर आहे दोन जिल्ह्यांच्या सीमेवर
दर्शनाला कसं जायचं, काय पहायचं घ्या जाणून
चांगभलं ऑनलाइन | हैबत आडके
यंदा 2023 च्या नवरात्र उत्सवाला आज घटस्थापनेपासून सुरुवात होतीयं. आजची पहिली माळ. यानिमित्त जाणून घेऊया, सातारा व सांगली जिल्ह्यातील भाविकांचे आराध्य दैवत, कराड तालुक्यातील शेणोली गावचे ग्रामदैवत श्री अकलाई देवीच्या मंदिराविषयी….
कराडपासून 16 किलोमीटर अंतरावर शेणोली गावच्या पूर्वेला डोंगराच्या मध्यभागात श्री अकलाई देवीचे पुरातन मंदिर आहे. कराडकडून किंवा सांगली, तासगावकडून या ठिकाणी यावयाचे असेल तर शेणोली गाव किंवा गडखिंड येथे उतरून तिथून पुढचा डोंगर पायथ्यापर्यंतचा प्रवास हा वाहनामधून किंवा पायी करता येतो. या रस्त्यावरून डोंगराच्या दिशेकडं वळताना दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाचं भव्य मंदिर लागतं. तिथं दर्शन घेऊन, पाणी बॉटल भरून घेऊन पुढे तुम्ही पूर्वेकडील डोंगराच्या दिशेने जाऊ शकता. काही अंतर चालून गेल्यानंतर डोंगर पायथा लागतो. इथं थोडी विश्रांती घेऊन वाहन पार्किंग करून तुम्ही पायी डोंगर चढू शकता. दहा ते पंधरा मिनिटं चढून गेल्यानंतर मंदीरात पोहोचता येतंं.
श्री अकलाई देवीचे हे मंदिर साधारणपणे चारशे वर्षांपूर्वीचं जुनं आहे. श्री अकलाई देवी इथं स्वयंभू झाली आहे. त्याबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी की, इथं देवी कोकणातून आली.. चिपळूण-विजापूर हा मार्ग पूर्वी बैलगाड्यांचा होता. या मार्गानं देवी इथं आली. सुरुवातीला पावक्ता पठार आणि त्यानंतर मच्छिंद्र गडावर देवीनं जागा शोधली, मात्र तिथली जागा तिला पसंत पडली नाही. त्यामुळे देवी आत्ता जिथे मंदिर आहे त्या ठिकाणी आली आणि स्वयंभू प्रकटली. हेच स्थान पुढे श्री अकलाई देवीचे मूळ स्थान म्हणून प्रसिद्ध पावलं. सातारा व सांगली जिल्ह्याच्या सीमेवरच हे मंदिर आहे.
या ठिकाणी गाभाऱ्यात देवीची मूर्ती आहे. गाभाऱ्याच्या बाहेरच्या बाजूला श्री गणपती, श्री विठ्ठल-रुक्मिणी, श्री दत्त, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आदी देवतांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या शेजारी दोन ठिकाणी पाण्याचे पुरातन टाके आहेत. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला श्री म्हसोबाचे स्थान आहे. दर पौर्णिमेला इथं सातारा आणि सांगली जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. हुताशनी पौर्णिमेला देवीची मोठी यात्रा भरते. यात्रेत दोन्ही जिल्ह्यातील मानाच्या बैलगाड्या येतात, पालखी मिरवणूक निघते.
धार्मिक पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा
नवरात्रोत्सवात येथील पुजारी देवीची वेगवेगळ्या रूपात पूजा बांधतात. दर्शनासाठी भाविक, विशेषता महिला भाविक मोठ्या संख्येने येतात. मंदिरातून आसपासच्या डोंगर भागातील वनराईचं विहंगमय दृश्य नजरेत साठवता येतं. खरं तर शासनाकडून एक धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून या मंदिराचा विकास व्हायला हवा, अशी मागणी भाविकांतून होत आहे.