
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवात गुरूवारी (ता. १८) सायंकाळी दुसर्यादिवशी ‘सूरबहार’ ही सदाबहार मराठी व हिंदी गाण्यांची मैफल झाली. दोन ते तीन दशकांपूर्वीची सुपरहिट हिंदी व मराठी गाणी सुमधूर आवाजात गात या कार्यक्रमाने कराडकरांची मने जिंकली.
मराठमोळ्या लावण्यांसह हिंदी व मराठी चित्रपटातील या मैफलीला राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख, कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुलबाबा भोसले, सौ. गौरवी भोसले, कृष्णा कृषी परिषदेचे अध्यक्ष गजेंद्र पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष पै. धनाजी पाटील, संजय पवार, कृष्णा कारखान्याचे कार्यकारी संचालक राम पाटील, संचालक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विक्रम – प्रल्हाद प्रस्तुत या कार्यक्रमात सहभागी कलाकारांनी ‘नार नटखट’, ‘ढोलकीच्या तालावर’, ‘राजा ललकारी अशी रे’ यासह विविध गाजलेल्या मराठी चित्रपटातील गाणी व लावण्यांवर कार्यक्रमास उपस्थित असणारी तरूणाई थिरकल्याचे चित्र पहावयास मिळाले. याशिवाय ‘हसता हुआ नुरानी चेहरा, ‘बदन पे सितारे’, ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ या सदाबहार हिंदी गाण्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. ‘दम मारो दम’ हे गाणे गात असताना गायकांना उपस्थितांकडून टाळ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला.
याशिवाय तीन ते चार दशकानंतरही युवा वर्गाच्या तोंडात असणार्या शोल चित्रपटातील ‘मेहबुबा…मेहबुबा’ या गाण्यासह जोगवा चित्रपटील ‘नदीच्या पल्याड’ या गीताद्वारे हा कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर नेण्यात गायकांना यश आले. याशिवाय ‘ये मेरा दिल प्यार का दिवाना’ यासह विविध देशभक्तीपर गीतांचे गायन करत या कार्यक्रमाने उपस्थितांची वाहवा मिळविली. तसेच ‘मेरे घर राम आए है’ या गीताद्वारे २२ जानेवारीला होणार्या अयोध्येतील श्री राम मंदिरातील मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे आगळ्यावेगळ्या शैलीत वर्णन करण्यात आले आणि यामुळे उपस्थित मंत्रमुग्ध झाल्याचे पहावयास मिळाले.
‘अतुलबाबा अपनी शान’ गीताने गर्दीत संचारला उत्साह..
‘सुरबहार’च्या मैफिलीसाठी डॉ. अतुलबाबा भोसले यांचे आगमन होताच, गायक प्रल्हाद पाटील यांनी डॉन चित्रपटातील ‘अरे दीवानो मुझे पहचानो’ या गीताच्या चालीवर ‘अतुलबाबा अपनी शान’ हे अतुलबाबांसाठी खास रचलेले गाणे सादर केले असता, गर्दीत उत्साह संचारला. उपस्थित रसिकांनी या गाण्याला प्रचंड प्रतिसाद देत, मोबाइलचा टॉर्च लावून हात उंचावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दरम्यान, प्रारंभी वाठार येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली.
कृष्णा महोत्सवात उद्या ‘ये जो देस है मेरा..’
कृष्णा सांस्कृतिक महोत्सवात उद्या (शनिवारी ) दुपारी २ वाजता सौ. तेजस्विनी शहा यांचा ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम खास महिलांसाठी आयोजित करण्यात आला आहे. तसेच सायंकाळी ५ वाजता भारताची देदीप्यमान वाटचाल गायन, नृत्य व निवेदनातून उलगडून दाखविणारा सांगितिक कार्यक्रम.. ‘ये जो देस है मेरा..’ आयोजित करण्यात आला आहे. श्री. मिलिंद ओक दिग्दर्शित या कार्यक्रमात ‘झी मराठी सारेगमप’ फेम गायक – गायिकांचा विशेष सहभाग असणार आहे.