कष्टाळू हात मांडणार कायद्याची बाजू ! शिवनगरची वैशाली झाली एल एल बी…!! – changbhalanews
शैक्षणिक

कष्टाळू हात मांडणार कायद्याची बाजू ! शिवनगरची वैशाली झाली एल एल बी…!!

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
मनात जिद्द असेल तर काहीही अवघड नसते, असे म्हणतात. कराड तालुक्यातील शिवनगरच्या वैशालीने हे कृतीतून दाखवून दिले आहे. तिने शेतात आणि शिक्षणात घेतलेल्या कष्टाचे तिला फळ मिळाले आहे. वैशाली एलएलबी परीक्षेत यशस्वीपणे उत्तीर्ण झाली आहे. तिचे कष्टाळू हात आता लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कायद्याची बाजू मांडण्यासाठी सरसावतील. त्यामुळे तिचे यश कौतुकास पात्र आहे.

वैशाली संजय मंडले असे या मुलीचे नाव आहे. कराड तालुक्यातील शिवनगर हे तिचे गाव. वडील संजय मंडले यांच्यासह वैशालीचे संपूर्ण कुटुंब शेती करतात, शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करतात. त्यावरच या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. वैशालीला घरातूनच श्रमाचा संस्कार मिळाला. त्यामुळे शालेय शिक्षण घेत असल्यापासून ती आई-वडिलांना घरी व सुट्टी दिवशी शेतात मदत करत आली आहे. शेतात खत घालने, जनावरांचे शेण, वैरण काढणे. स्वयंपाक करणे अशी कामे करून ती कुटुंबाला मदत करत होती. स्वावलंबनाचे धडे गिरवताना आई-वडिलांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या वैशालीने तिचे एलएलबीच्या परीक्षेत पास होऊन वकील होण्याचे स्वप्न साकारले. तिने मिळवलेले हे यश पाहून जन्मदात्यांचे डोळे पाणावलेच पण गावकऱ्यांचा उर ही अभिमानाने भरून आला. पुरेशा सोयी सुविधा नसताना, शेतकरी, कष्टकरी कुटुंबातील वैशालीने मिळवलेले यश सर्वांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

या यशाबद्दल शिवनगर येथे कुमारी वैशाली संजय मंडले हिचा तिच्या पालकांच्या उपस्थितीत आमदार डॉ. अतुलबाबा संगीत प्रेमी ग्रुप, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अधिकराव सोमदे, इलाई मुल्ला, ग्रा.पं माजी सदस्य हणमंत बागले, प्रा. अमोल मंडले, सोसायटीचे संचालक विकास सावंत, दिलीप धर्मे , सुहास खोत, नरेंद्र पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी वैशालीचे वडील संजय मंडले म्हणाले, आमचा समाज शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेला. त्यामुळे आमच्यावरही बालवयातच श्रमाचे संस्कार झाले. आम्ही मुलांनाही कष्ट करून स्वावलंबी होण्याची शिकवण दिली. मात्र हे करताना मुले शिकावी, खूप मोठी व्हावी, ही इच्छा पहिल्यापासून होती. वैशालीही आम्हाला रानातील कामासाठी नेहमीच मदत करत असते. त्यामुळे ती रात्री अभ्यास करण्यासाठी जागत राहायची. बालपणापासूनच तिचं वकील होण्याचं स्वप्न होतं. ते तिने अखेर पूर्ण केलं.‌ निकाला दिवशी सुद्धा ती दिवसभर शेतात आमच्या सोबत काम करत होती. संध्याकाळी तिने मोबाईल वरतीच निकाल पाहिला अन् पास झाल्याचं आम्हाला सांगितलं. तिच्यासाठी आणि आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी हा मोठाच आनंदाचा क्षण होता. आम्हाला तर आमच्या कष्टाचं चीज झाल्याचे समाधान वाटले, अशा शब्दात संजय मंडले यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

वैशालीच्या सत्कार प्रसंगी संपत मंडले, बाळाबाई मंडले, फत्तेराव मंडले, सौ. सुवर्ण़ा मंडले, सौ. उषा मंडले, बाळाबाई मंडले, धनाजी मंडले, सारिका मंडले, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन दिलीप धर्मे यांनी केले तर आभार प्रा. अमोल मंडले यांनी मानले.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close