आठवणींची गर्दी जणू… क्षण हा सौख्याचा – सेक्रेटरी मारुती पाटील सेवानिवृत्ती विशेष

निरोपाचा क्षण जणू,
हळव्या त्या फुलांचा….
आठवणींची गर्दी जणू,
क्षण हा सौख्याचा….!
गावातील विकास सोसायटीचा सचिव म्हणजे अलीकडचा ना पलीकडचा. त्याच्यासमोर रात्र थोडी आणि सोंगं फार… कामापेक्षा मनस्ताप जास्त... त्यातही गावगुंडीचं राजकारण.. सत्ताधारी अन् विरोधकांच्या प्रेशर खाली काम करताना दोन्हीकडचा समन्वय साधणं, जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवणं, सभासद शेतकऱ्यांना संस्था आपली वाटावी असं वागणं आणि बोलणं… खरंच हे काम म्हणजे म्हटलं तर तारेवरची कसरतच… संस्थाहित पाहताना आपलं-तुपलं.. वेडं-वाकडं करून चालत नाही, सगळी आव्हानं पेलत संस्थेला प्रगतीच्या दिशेने नेण्याचं काम सचिवाला करावं लागतं. असं काम करणारा , या कसोट्या पार करणारा , आपल्या प्रामाणिक सेवेचा ठसा हा सभासद आणि समस्त गावकऱ्यांच्या मनावर उमटवणारा नांदगावच्या मारुती पाटील यांच्यासारख्या सचिवाचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ हा खरेच आठवणींची गर्दी जमवणारा एक सौख्याचा क्षण असेच म्हणावे लागेल.
कराड तालुक्यातील दक्षिण मांड नदीच्या दोन्ही तीरावर वसलेलं नांदगाव हे तालुक्याच्या डोंगरी भागातील एक महत्त्वाचं गाव. विस्तारानं मोठ असलेलं. गावाला अनेक मळं, वाड्या आहेत. दक्षिण-उत्तर दोन डोंगरांच्या मध्ये नांदगाव वसलं आहे. शेत जमिचा पट्टा मोठा. पण थोडी बागायती आणि बहुतांशी कोरडवाहू शेती. दिवंगत विलासकाका पाटील-उंडाळकर, स्वर्गीय यशवंतराव मोहिते व स्व जयवंतराव भोसले, ज्येष्ठ नेते भीमरावदादा पाटील या राजकीय क्षेत्रातील मंडळींचं त्या काळापासून या गावावर विशेष प्रेम राहिलं. त्या काळात गावाच्या आर्थिक गरजा पूर्ण करणारी एकमेव संस्था म्हणजे नांदगाव ग्रामविकास सेवा सोसायटी होती. या संस्थेला स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर काका यांनी नेहमीच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून आणि प्रशासकीय पातळीवरही भक्कम सहकार्य केलं. त्यांचं सातत्याने मार्गदर्शन ही लाभलं. ही गावपातळीवरची सोसायटी असली तरी तब्बल एखाद्या पतसंस्थेचे , बँकेचे सभासद असावेत इतके म्हणजे 800 ते 900 इतके संस्थेचे खातेदार सभासद आहेत. त्यामुळे अशा संस्थेचं सचिव म्हणून काम करणं ही जेवढी मोठी संधी, तेवढीच ती मोठी जबाबदारी. मात्र मारुती पाटील यांनी आपल्या अंगभूत कौशल्याचा वापर करत ही जबाबदारी आजवर समर्थपणे पेलली.
ग्रामीण भागात सोसायटीच्या सचिवाला ‘सेक्रेटरी’ म्हणतात. सचिव हा मराठी शब्द असला तरी ‘सेक्रेटरी’ म्हटलं की पदाची छाप पडते, दरारा जाणवतो. त्यामुळे संस्थेचा सभासद शिक्षण घेतलेला नसला तरी ‘सेक्रेटरी’ म्हटलं की त्याला कोणं ते बिलकुल सांगावंच लागत नाही. पांढरी खादीचे कपडे घालून इस्त्री न मोडता फिरणारे आणि चेअरमनलाही जमणार नाही असा रुबाब झाडणारे असे अनेक ‘सेक्रेटरी’ मी आजवर अनेक गावात पाहिले आहेत. मात्र पॅन्ट-शर्ट असा साधा पोशाख , उच्च आणि स्वच्छ विचार, समंजस आणि लाघवी बोलणं, वेळप्रसंगी कठोर शब्दात ही सुनावणं, माहिती घेणं आणि मगच बोलणं, असा नांदगावच्या सेक्रेटरी मारुतीराव पाटील यांचा स्वभाव. त्याच जोरावर त्यांनी या संस्थेत कामाला सुरुवात केली, त्याला आज 30 वर्षे झाली आहेत. सुरुवातीला सेल्समन, नंतर असिस्टंट सेक्रेटरी , आणि शेवटी सेक्रेटरी अशा पदांवर संस्थेत त्यांना वेळोवेळीच्या संचालक मंडळाने सेवेची संधी दिली.
सोसायटीमध्ये ‘कम’ (कर्ज मंजूर) ही दरवर्षी चालणारी पीक कर्जाची प्रक्रिया असते. त्याशिवाय सामान्य कर्ज, जिल्हा बँकेच्या माध्यमातून अवजारांसाठी, शेतीपूरक साहित्य, यांत्रिकीकरण यासाठी दिली जाणारी कर्जे महत्वाची असतात. ती देताना , वसूल करताना, आणि त्यांचे नूतनीकरण करताना सेक्रेटरीला कसब पणाला लावावे लागते, त्यातूनही काही राहिलं तर पदाधिकारी आणि संचालक मंडळ यांची जबाबदारी असतेच. मात्र सेक्रेटरी दमदार असेल तर पदाधिकारी आणि संचालक मंडळांना फार कष्ट घ्यावे लागत नाहीत, त्यांचे बहुतांश काम सुलभ होते. असा सेक्रेटरी संस्थेला मिळणं हेही महत्वाचं असतं. पण नांदगाव ग्राम विकास सोसायटीला मारुतीराव पाटील यांच्या माध्यमातून असा चांगला सेक्रेटरी मिळाला हे आवर्जून नमूद करावं वाटतं.
गेल्या 30 वर्षांची सेवा करून मारुती पाटील हे सेक्रेटरी पदावरून सेवानिवृत्त झाले. संस्थेच्या खेळीमळीत पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चेअरमन बाळासाहेब पांडुरंग पाटील, व्हाईस चेअरमन जनार्दन भिकाजी पाटील, संचालक तुकाराम कृष्णा पाटील, हिंदूराव बंडू गुरव, भिमराव सखाराम पाटील, विनोद दिनकर पाटील, संजय बापू पवार, रामचंद्र बाळासो पाटील , विजय आकाराम पवार, तुकाराम बंडू मोहिते, राजाराम आकाराम कांबळे, जगन्नाथ दत्तात्रय माळी, शंकर परशराम पाचंगे, सुनीता तानाजी पाटील, सुनंदा आण्णा येळवे, तज्ज्ञ संचालक सुहास बाबुराव पाटील, संपत भास्कर पाटील, सचिव मारूती पाटील, नवनियुक्त सचिव भूषणकुमार भगवान पाटील, सेल्समन तानाजी भिमराव पाटील, शिपाई अशोक पवार यांच्यासह सभासदांच्या उपस्थितीत मारुती पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. शारदा मारुती पाटील या उभयतांचा सत्कार करण्यात आला. हा क्षण समस्त नांदगावकरांना भावूक करणारा आणि भारावून टाकणारा असा होता.
संस्थेच्या सभासदांना गेली 30 वर्षे मारुती पाटील यांनी आपल्या कुटुंबातील सदस्य समजून काम केलं. ते करताना प्रामाणिकपणाशी कधीही तडजोड केली नाही. त्यामुळे संस्थेतील सर्व गटातटाच्या सभासदांना ते जवळचे वाटत. त्यांच्या मार्गदर्शनाचा , अनुभवाचा, अभ्यासाचा आजवर संस्थेला निश्चित फायदा झाला, सेवानिवृत्ती सत्कारावेळी आजी-माजी संचालकांनी तसं बोलूनही दाखवलं. मारुती पाटील यांनी संस्था चांगली चालवलीच. त्याचबरोबर स्वतःचा प्रपंचही नेटका केला. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग केले, विस्तार केला. त्यांच्या पत्नी सौ. शारदा पाटील या गृहिणी आहेत तर मुलगा रोहीत बीफार्म झाला असून मुलगी मयुरी बीएससी नर्सिंग, तर दुसरी मुलगी माधुरी इलेक्ट्रिक इंजिनियर झाली आहे. दोघी विवाहित आहेत. मुलांना उच्च शिक्षण आणि संस्कार देण्यामध्ये पती-पत्नी दोघांनी कोणतीही कसर ठेवली नाही.
नोकरीतून अनेकजण सेवानिवृत्त होत असतात. मात्र सूर्यासारखं तळपून म्हणजे कष्ट आणि परिश्रमाच्या जोरावर स्वतःचा वेगळा ठसा ठेवून संस्थेमधील सेवानिवृत्तीच्या निरोपाचा क्षण भावूक करणारे, समस्त सभासदांना भारावून टाकण्याची क्षमता ठेवणारे मारुती पाटील यांच्यासारखे फार थोडेच लोकं असतात. त्यांना पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!! त्यांच्याबद्दल आवर्जून म्हणावं वाटतं…
सूर्यासारखे तळपूनी जावे,
क्षितीजावरूनी जाताना…!
दगडालाही पाझर फूटावा,
सेवानिवृत्तीचा सत्कार होताना…!!
– हैबतराव आडके, संपादक, चांगभलं.