कराडच्या रोटरी क्लबने सलग तीन वर्षे प्रयत्न करून दुर्गम पाठरवाडीला केले अंधमुक्त!
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
दृष्टी प्रोजेक्ट अंतर्गत दर्या खोऱ्यात वसलेल्या दुर्गम पाठरवाडी ता. कराड येथील 46 ग्रामस्थांच्या डोळ्याची मोफत तपासणी गेल्या आठवड्यामध्ये डॉ. राहुल फासे सर यांच्या संस्कार नेत्र रुग्णालयामध्ये पूर्ण झाली. 46 पैकी 8 ग्रामस्थांची मोतीबिंदूची मोफत सर्जरी आज संस्कार नेत्र रुग्णालय येथे यशस्वी रित्या पुर्ण करण्यात आली.
पाठरवाडी हे डोंगरावर वसलेले गाव आहे. रोटरी क्लबने या गावांमध्ये प्रत्येक घरामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. तसेच रोटरी क्लब कराडने सलग 3 वर्षे प्रयत्न करून हे गाव अंधमुक्त केले आहे. डॉ. राहुल फासे आणि डॉ. अस्मिता फासे यांनी या शस्त्रक्रिया केल्या आहेत. भुलतज्ञ म्हणून डॉ. शेखर कोग्नुळकर यांनी योगदान दिले.
या शस्त्रक्रियेनंतर सर्व रुग्ण , ग्रामस्थ यांनी सर्जरी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचे समाधान व्यक्त केले. त्यांनी रुग्णालयाचे व रोटरी क्लब ऑफ कराडचे मनापासून आभार मानले आहेत. याप्रसंगी डॉ. राहुल फासे, डॉ. अस्मिता फासे, डॉ. शेखर कोग्नुळकर, रोटरीचे अध्यक्ष बद्रीनाथ धस्के, विनायक राऊत आणि संस्कार नेत्र रुग्णालयाचा स्टाफ उपस्थित होता.