पोलिसांनी पकडली चोरीची शेळी अन् बोकड!
चोरट्याकडील मोटरसायकलही जप्त : कराड ग्रामीणच्या डीबीची कारवाई
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड तालुका गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलिसांनी म्होप्रे ता. कराड येथुन चोरीस गेलेली मोटारसायकल व एक शेळी व दोन बोकड संशयित आरोपीकडून तात्काळ पकडून जप्त केली आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दिनांक. १० डिसेंबरच्या रात्री म्होप्रे ता.कराड गावचे हद्दीत उत्तम जयराम जाईगडे यांचे बंदीस्त शेडातुन शंकर आनंदा पुजारी रा. म्होप्रे ता.कराड जि. सातारा यांची तसेच गावातील सुनिल रमेश संकपाळ यांचेसुध्दा बंद असलेले शेडमधुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने २ बोकड व १ पाटशेळी चोरुन नेली होती. तसेच शशिकांत नंदकुमार जाधव यांची बॉक्सर मोटारसायकल (क्रमांक एम एच १०, व्ही ६८८७) चोरीस गेलेबाबत काल दि. ११डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता तक्रार दिली होती.
त्यानंतर पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकुर, कराड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या सुचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि बाबर, हवालदार नितीन येळवे, सज्जन जगताप, सचिन निकम, उत्तम कोळी, प्रफुल्ल गाडे, कोळे दूरक्षेत्राचे हवालदार प्रदीप कांबळे, गणेश वेदपाठक, समीर कदम यांनी लगेच फिर्यादी यांचे मदतीने गावातील संशयीत आरोपी तानाजी महादेव चव्हाण व सुरज रमेश शिंदे दोन्ही रा. म्होप्रे ता. कराड जि.सातारा यास ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडील चोरीची २ बोकड व १ पाटशेळी पकडली. त्यासह मोटारसायकल असा ७५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करुन जप्त केला.
ही कामगिरी पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक ऑंचल दलाल, पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि बाबर, हवालदार नितीन येळवे, सज्जन जगताप, सचिन निकम, उत्तम कोळी, प्रफुल्ल गाडे, कोळे दूरक्षेत्राचे हवालदार प्रदीप कांबळे, गणेश वेदपाठक, समीर कदम यांच्या पथकाने केली. हवालदार नितीन येळवे तपास करत आहेत.